देशीवाले सद्गृहस्थ आणि व्होडका


मी रात्रभर दबा धरून बसून आहे.
डोळे जड झालेत, डुलकी येतेय; पण
मला आज छडा लावायचाच आहे.
माझ्या घराबाहेर काही फुलझाडं आहेत. पावसाळ्यात त्यांच्या आजूबाजूला गुलबक्षीची असंख्य रोपे उगवून येतात. तिच्या निरनिराळ्या रंगाच्या फुलांनी आळ्यात चक्क गोकूळ नांदू लागते.
गेल्या काही दिवसांपासून या गोकुळआळ्यात देशी दारुच्या बाटल्या दिसू लागल्या आहेत. जाता येता मला त्या हाटकून दिसतात. झाडांच्या दाटीवाटीतूनही त्या आपलं स्टीकर अलगद तुमच्या डोळ्यासमोर फडकवतात. मग मी अस्वस्थ होतो. तिथं हात घालून बाटल्या उपसाव्यात आणि दूर भिरकावून द्याव्यात अशी मला तीव्र इच्छा होते; पण मी तसे करत नाही.
एकतर समोरच्या बाजूला भरपूर दुकानं झाली आहेत. तिथं गर्दी असते. त्यामुळे आपण त्या बाटल्या काढताना कुणाची नजर जाईल आणि ती सारी मंडळी कामधंदे सोडून आपल्याकडेच बघू लागेल याची भीती मला वाटते. शिवाय त्या भिरकावून द्याव्यात अशी मोकळी जागाही आजूबाजूला नाही. पूर्वी अधुन मधून तिथं व्होडकाची बाटली मला दिसत असे. भंगारवाल्याला सांगून मी तिची विल्हेवाट लावत असे. पण आता हे रोजचेच झाले आहे आणि तेही देशी दारुच्या उद्धट बाटल्यांचे.
कुणाच्या पिण्यावर माझा बिलकुल आक्षेप नाहीयेय. त्यानं काय प्यावं याच्याशीही मला काही देणेघेणे नाहीयेय. फक्त मला त्या सद्गृहस्थाला बघायची तीव्र इच्छायेय. मला जर यश आले आणि एखाद्या रात्री तो मला सापडलाच तर त्याच्याशी कसे वागायचे हे मी ठरवून ठेवले आहे. त्यावेळी मी त्याला बिलकुलच दमदाटी करणार नाही. उपदेशाचे डोसही पाजणार नाही. रात्रीअपरात्री पिलेल्या माणसांशी न पिता पंगा घेवू नये हे मला चांगलेच कळते. उलटपक्षी मला त्याला काही सुचवायचं आहे.
‘बाबा रे, तू देशी दारू पितोहेस, खुशाल पी. दारुच्या बाटल्या आमच्या आळ्यात फेकतो आहेस, खुशाल फेक. मित्रा, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. किमान त्या बाटलीतले दोनपाच थेंब तिथल्या झाडावरही शिंपड. झालीच तर त्यांच्या पानावरची कीड तरी नष्ट होईल आणि तीही तुझ्यासोबत डोलायला लागतील. त्यांच्या निरोगीपणात तुझं सुख असेल. ती तुला भरभक्कम आशीर्वाद देतील. शिवाय नशापाणी करायला झाडाझुडपांएवढी चांगली कंपनी दुसरी नाही. त्यांना पिताना सोबत घे. तुला आयुष्यात पुन्हा कधीच दारु कमी पडणार नाही.
........
गेल्या काही दिवसांत आजूबाजूचे काहीजण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागले आहेत. ते माझ्या नजरेतून सुटलेले नाही. मला पक्का संशय आहे की, हे जे कोणी माझ्याकडे असल्या भलत्या नजरेने पाहताहेत ते लोक बहुतेक भल्या सकाळी माझ्याकडची फुलं तोडायला येणारी मंडळी असावीत. त्यांना गुपचूप फुलं तोडून नेताना आळ्यात जे काही दिसतं त्याचा संदर्भ ते माझ्याशी जोडत असावेत.
परवा तर एक वयस्कर आजी माझ्या बायकोशी फारच सहानुभूतीने बोलल्या आणि त्यांनी ‘कसंय बाई, बरं चाल्लंय ना’ अशीही मायेने चौकशी केली. अशा अचानक चौकशीने बायकोही चकित झाली. त्यांच्या चौकशीमागचे गौडबंगाल तिला कळाले नसावे; पण माझ्या लक्षात आले आहे. मला दाट संशय आहे की, त्या आजीही माझ्याकडची फुलं तोडत असाव्यात.
.....
पण यातल्या माझ्या बदनामीचा एक शब्दही मी त्या पिणा-या सद्गृहस्थाला सांगणार नाही. मला फक्त त्याला एवढंच विचारायचंय की, पूर्वी तिथं व्होडकाच्या बाटल्या सापडायच्या, त्या तूच टाकत होतास काय? टाकत असशील तर मग व्होडकावरनं तू एकदम देशी दारुवर कसा आलास? आणि तेही दररोज? त्यामागे काही कारण आहे काय? त्याच्या या प्रवासाबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे.

टिप्पण्या