धटिंगण आणि झाड
परिचितासोबत त्यांच्या गाडीत जात होतो. नेमके वळत असतानाच अचानक एक मोटारसायकल आम्हाला ओव्हरटेक करून पुढे आली आणि त्याच वेळी त्या स्वाराचा मोबाईलही वाजला. त्यानं लगेच गाडी थांबवली. परिचितानेही कच्कन ब्रेक मारला.
अरुंद रस्त्याच्या तोंडाशी आम्ही थांबलेलो. मोटारसायकलस्वार महाशय वळणाच्या मधोमध गाडी आडवी थांबवून मोबाईलवर बोलताहेत. बोलता बोलता चोहोकडून त्यांचं अंग लाटांसारखं खालीवर होतंय. खांदे कानाकडे जावून पुन्हा खाली येताहेत. तिकडून बहुधा त्यांचं प्रेमपात्र बोलत असावं. पाच दहा मिनीटे होऊन गेली. त्यांचं आटपेचना.
परिचिताला म्हटलं, ‘दादा, हॉर्न द्या ना.’
त्यांनी मला स्माईल दिलं.
मला वाटलं त्यांना ऐकू गेलं नाही. मी पुन्हा म्हटलं,
‘हॉर्न द्या ना. किती वेळ थांबणार त्याच्यासाठी?’
त्यांनी हॉर्न दिलाच नाही. उलटपक्षी मलाच अजून एक लांबलचक स्माईल दिलं.
स्वाराचं बोलणं चालूच होतं. त्याच्या अंगातली थरथर आता त्याच्या मोटारसायकलमध्येही शिरली होती. तिच्याही अंगमोड्या सुरू झाल्या होत्या. स्वार हं हो हं हो म्हणत चांगलेच लटके लटके फडकू लागले होते.
‘दादा, आपला हॉर्न वाजत नाही काय? खाली उतरून त्याला बाजूला सरकायला सांगू काय?’ असं म्हणून मी दार उघडू लागलो तर त्यांनी माझा हात पकडला. म्हणाले, ‘थांबा. त्याच्याकडं नीट पाहिलंय का? त्याच्या गळ्यात बघा, किती काय काय लटकतंय आणि मनगट तर किती चकाकतंय. उगाच पंगा कशाला? शिवाय त्याचा इमोशनल विषय असणार. थांबू ना थोडावेळ. नाही तर पलीकडच्या रस्त्याने जाऊयात. फार तर मैलाभराचा फेरा पडेल बस्स.’
......
गल्लीतल्या झाडाची एक फांदी खाली झुकली होती म्हणून हेच परिचित महाशय भांडभांड भांडले होते शेजा-याशी. बरं ती फांदी जाता येता कुणाला लागावी एवढीही खाली आलेली नव्हती. एखाद्याची उंची फारच, म्हणजे सहा फुटावर असेल तर फांदीवरची दहापाच खट्याळ पानं त्याला गुदगुल्या करायची, बस्स! गल्लीतले पोरंबाळं येता जाता उडी मारून त्या फांदीशी शेकहँड करायचे.
त्या फांदीलाही आता सोन्याचांदीच्या कड्यांनी आणि लॉकेटनी मढवावं काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा