चिंकीवाले अंकल!

आमच्या ओट्यावरून चिंकीला दिसायची ती बाल्कनी.
तिथे पूर्वी गुलमोहराची मोठे झाड होते.
त्यात बाल्कनी लपून जायची.
अकरा वर्षात चिंकीची पाच बाळंतपणं झाली. पंधरातली सहाच पिल्ले तिच्यासारखी पांढरीशुभ्र होती. बाकीची अशीच. सगळी जिकडेतिकडे पांगली.

पाचापैकी एका बाळंतपणानंतर आम्हाला अचानक बाहेरगावी जावं लागलं. तिची पोरं आठवडाभराचीच होती. तिला कुठे ठेवावे हा प्रश्न होता. बायको म्हणाली, झंवरभाभीला विचारते.
.....
आमच्या घराच्या समोरच्या फ्लॅटमध्ये झंवर कुटुम्बीय राहतात. त्यांच्याकडेही पूर्वी कधीतरी पामेरियन होतं. चिंकीकडे पाहिलं की त्यांना त्याची आठवण यायची. मग त्यांची मुलगी किंवा कधीकधी लंडनहून आलेली सून चिंकीला न्यायला यायच्या. ब-याचदा तिला न्हाऊखाऊ घालून परत आणून सोडायच्या. त्यांच सार कुटुंबच प्राणीप्रेमी.

चिंकी थोडी मोठी झाली तसा तिचा झंवर कुटुम्बियात मुक्त संचार सुरू झाला होता. घरातून सुटली की, रस्ता ओलांडून अपार्टमेंटचा जिना चढून ती त्यांच्या घरात शिरायची. मातीत लोळून मळक्याचिळक्या झालेल्या अवस्थेत त्यांच्या सोफ्यावर यथेच्छ लोळायची. पुरता धुमाकूळ घालून कधीतरी परतायची.
.......
मग बायकोने झंवरभाभींना विचारलं आणि लगोलग चिंकी आणि तिच्या तिन्ही पिलांची त्यांच्याकडे रवानगी झाली. आम्हाला परतायला आठऐवजी पंधरा दिवस लागले. तोपर्यंत तिचं रुपडंच पालटून गेलं होतं. ती गुबगुबीत आणि अधिकाधिक पांढरीशुभ्र दिसायला लागली होती.
..........

एके रात्री चिंकी जीव तोडून भुंकत होती. बेडरूमच्या खिडक्या रस्त्याकडेला असणारांची अशावेळी झोपमोड होणे साहजिकच होते. आणि लँडलाईनवर आम्ही शिव्या खाणेही. शेवटी मी तसाच तडफडत बाहेर गेलो तर चिंकी साखळीला झटके देत कंपाऊंडवॉलच्या दिशेने उड्या मारत भुंकत होती. तिला पलीकडचं काही दिसण्याची सूतराम शक्यता नव्हती. पण मग ती कुणावर भुंकत होती?

मी गेट उघडून बाहेर गेलो. रस्त्यापलीकडे काही दुकानं आहेत. एका दुकानाच्या पत्र्यावर मला हालचाल दिसली. झाडांच्या फांद्या आडव्या असल्याने दिसत नव्हतं. मी आणखी पुढे गेलो तर कुणीतरी झंवर कुटुम्बियाच्या बाल्कनीत उतरण्याच्या तयारीत असलेले दिसले. अर्थातच चाहूल लागल्याने तिथली हालचाल थांबली आणि काही मिनिटांत खालच्या दिशेला धप्पकन आवाज होऊन विरून गेली.

घटना एवढीच. झंवर कुटुम्बियाला यातले काहीच माहीत नसणार, त्यांना ते कळण्याची शक्यताही नव्हती. पण आम्हाला त्यांच्या आणि चिंकीच्या नात्याची किनार कळली. नंतर चिंकीच्या निमित्ताने त्यांची आणि आमची ओळख आणखी दृढ झाली. पुढे त्यांच्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्याची पत्रिकाही त्यांनी आम्हाला आवर्जून पाठवली.
..........

चिंकीशी खेळायला कॉलनीतली लहान मुलंही यायची. शाळकरी मुलं सकाळी गेटपाशी रेंगाळायची. कुणी आजोबा-आजी नातवाला कडेवर घेऊन भूभू दाखवायला यायचे. धीट मुलं चिंकीला संध्याकाळी फिरवून आणायचे. कधीकधी ती सुटायची आणि धूम ठोकायची. दुस-या कॉलनीतून तिला कुणीकुणी घरी आणून सोडायचे. कॉलनीभर तिची ओळख झाली होती.

एकदा कॉलनीतल्या रस्त्यावर मुलांनी क्रिकेटचा डाव मांडला होता. मी बाहेरून परतत होतो. त्यांच्या फलंदाजानं मारलेला फटका माझ्या अगदी मानेजवळून गेला. थोडक्यात बचावलो. मी तसाच पुढे येत नाही तोच मागे त्यांच्यातला एकजण फलंदाजावर ओरडला, अबे, संभालके, वो चिंकीवाले अंकलको लग जाता तो?
.......

तात्पर्य असं की, दरवेळी आपण आपल्याच नावाने ओळखले जाऊ असं नाही. आपली असंख्य नावं असू शकतात. ती आपल्याला माहीत होतीलच असे नाही. ‘चिंकीवाले अंकल’ हे त्यापैकीच. शिवाय आपल्याला आलेली निमंत्रणं किंवा एखादी लग्नपत्रिका ही कधीकधी आपल्या डॉगीचीच देण असू शकते. किंवा ‘अंकलला बॉल लागला असता तर..’ ही आपल्याविषयी पोरांना वाटणारी कळकळही डॉगीच्याच प्रेमापोटी असू शकते. त्यांच्या नजरेत आपण त्यांना प्रिय असलेल्या कुत्र्याचे पालक असतो.
.....

चिंकी गेली त्याला काही वर्ष झाली. नातवांना फिरवणारे कुणी आजी- आजोबा आता गेटपाशी रेंगाळत नाहीत. रात्रीअपरात्री खेकसून फोन येत नाहीत. चिंकी होती तेव्हा घराला जाग होती, वाड्याला आवाज होता. फेरीवाल्यांत अपरिहार्य आदब होता. भले गल्लीत कुत्रं ओळखत नसेल; पण कुत्र्यामुळे गल्ली ओळखते असं बिनदिक्कत सांगता यावं असा जीवलग होता.

टिप्पण्या