दुतोंड्यांची किंमत


परवा नेटवर मांडूळ शोधत होतो, तर अशी काही बातमी बघण्यात आली की, चकितच व्हायला झालं, शिवाय थरथरलोही.
मांडूळ शोधण्याचं कारण असं होतं की...
पावसाळ्याच्या काळात कुंड्याखाली, पालापाचोळ्यांच्या पिशव्यांखाली भरपूर गांडूळ आढळतात. कुंडीची जागा हलवताना मग या मंडळीना हलकेच उचलून कुंडीत सोडावं लागतं. तर असंच काही चालू असताना एका कच-याच्या पिशवीखाली भलामोठा गांडूळ दिसला. त्याला उचलायची हिंमतच होईना. मग त्याला तसंच वाढू घातलं. म्हटलं काही दिवस राहू द्यावं, नंतर बघू. पंधरा दिवसांनी बघितलं तर महाशय अजूनच वाढलेले. त्यांची फुटाकडे वाटचाल सुरू झाली. एवढं गांडूळ कधीच बघण्यात आलं नव्हतं. मग संशय आला. हे गांडूळ नसून दुसरंच काही असेल तर?
बरं सापाचं पिल्लू म्हणावं तर असं कशाला सुस्त बसून राहील? कुणीतरी म्हणालं, बहुतेक मांडूळ असेल. ते अजून मोठं होईल. मांडूळ ही सापाचीच जात; पण स्वभावात साप नाही. फार पूर्वी माळवदाचं घर असताना गावाकडे छतातून खाली घरात धपकन मांडूळ पडल्याची रसभरीत गोष्ट बायकोने सांगितली. मग उत्सुकता वाढली. मांडूळाबद्दल गुगल करायला गेलो तर हा पठ्ठ्या भलताच जगप्रसिद्ध असल्याचं ध्यानात आलं.
मांडूळ जातीनं साप असला तरी कामानं गांडुळै. त्याचं मातीतच काम चालू असतं. गांडुळ माती कसदार बनवतात आणि हे महाशय गुप्तधन हुडकत फिरतात म्हणे. अर्थातच मग त्याची किंमत अव्वाच्या सव्वा. मग ओघानंच तस्करी आली. तस्करी करणा-या लोकांना पकडल्याचं आणि त्यांच्याकडच्या दोन मांडूळाची किंमत प्रत्येकी पन्नास लाख असल्याचं एका बातमीत होतं. नंतर एका ठिकाणी त्याची किंमत एक कोटी होती, तर दुस-या एका ठिकाणी चक्क दोन कोटी. मग हिंदीतल्या बातम्यांचा एक व्हिडीओ पाहिला तर ‘देखो दो मूहॉ साप... ’असं म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत चक्क पंचवीस कोटी सांगण्यात आलं होतं.
हे मांडूळ सहा महिने एका तोंडाने खातं आणि सहा महिने दुस-या तोंडाने खातं म्हणे. औषधी बनवणारे लोक आणि तांत्रिक याच्या शोधातच असतात म्हणे. बापरे! त्याचीच एवढी किंमत असेल तर मग वेगळ्या गुप्तधनाची गरजच काय? तो स्वत:च एक गुप्तधन म्हणायचा.
तात्पर्य, माझ्या कच-याच्या पिशवीखाली चक्क कोट्यवधी रुपयांचा माल असण्याची शक्यता होती. हे कुठं आणि कसं विकलं जातं याची मात्र काहीच माहिती सापडली नाही. ती माहिती तशी कुठूनही मिळवता आली असती; पण एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार करायचा कसा? बाहेरच्या देशात ते न्यायचं कसं?
परवा पुन्हा पिशवी हटवून बघितलं. त्याच्याभोवती दहापाच गांडुळांची पिलावळ हुंदडतेय. हुश्श झालं. बेट्याचा मांडूळ निघाला असता तर घेणं ना देणं किती कुटाणे!
नेटवरच्या असल्या बातम्या वाचू-बघूने रे बाबा!
............
मांडूळाचं काहीही असो,
दुतोंड्यांना मात्र सांप्रतकाळी चांगला भाव आहे हे नक्की!!

टिप्पण्या