झाडलोट आणि रात्रीस.....!

पानगळीतला पाऊस भलताच अस्वस्थ करतो. त्यातल्या त्यात रात्रीचा असेल तर त्याने परसात काय काय करून ठेवलंय याची चिंतायुक्त उत्सुकता असते.

सकाळी नुसता राडा असतो. कुठून कुठून उडून आलेल्या प्लास्टीक पिशव्या आणि आपल्याकडे नसलेल्या त-हेत-हेच्या झाडांची पानं या पसा-यात नांदत असतात. साहजिकच प्रश्न पडतो, अरे, ही पानं शेजारच्या बंगल्यातली असतील काय? की पलिकडच्या बंगल्यात आहे हे झाड? की चौकात असेल काय? कधीकधी तर पलिकडच्या गल्लीतल्या झाडांची पानंही आपल्याकडच्या पानांत खेळायला एवढ्या दूरवर आलेली असतात. बांबूची पानं तर झुळूकेचा उशीर लगेच फुलपाखरागत विहार करायला लागतात.

उजेडू लागलेल्या अंधारात हा पसारा झाडण्यासारखा दुसरा आनंद नसतो. मोकळ्या भागातली साचलेली सगळी पानं आपखुशीनं या मेळ्यात सामील होतात; मात्र फरशीच्या एखाद्या फटीत देठ आडकवून बसलेलं एखादं हट्टी पान तुम्हाला बिलकुलच दाद देत नाही. तुमचा खराटा हा मेळा घेवून पुढे निघालेला असतो आणि हे महाशय तिथंच दट्टावून बसलेले असतात. मग तुम्ही मागे येता, खराट्याने त्याला ओढता, ते अजूनच पक्कं पकडून बसतं. कधी ते झटक्यात एखाद्या कोप-यात असं जावून बसतं की, तुमचा खराटा तिथवर न्यायचा तर त्याच्या दोनचार काड्यांचा बळी जाणार. शेवटी आपणच हात लांबवतो. त्या हट्टीखोर पानांना लाडीगोडी लावतो. त्याची पकड अलगद हाताने सोडवतो. कडेवर उचलून घेतो आणि नंतर बाकीच्या पसा-यात सामील करतो.

पण एकूण हा पसारा लोटत लोटत ईप्सित स्थळी नेईपर्यंत खराटा एवढा मस्त खुशीत चालत असतो ना, बस्स, त्याची नजरच काढावी!
....

गेल्या काही दिवसात या झाडलोटीचा आवाज अधिक तीव्रतेने येतोय मला. हा आवाज पूर्वी कुठंतरी ऐकलाय असंही सारखं सारखं वाटत जातं आणि अनामिक थरथर येते अंगावर. कुठं बरं ऐकलाय हा झाडण्याचा आवाज? हा, कधीकाळी बघितलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये!

टिप्पण्या