प्रेम असावं तर असं.
जुनी गोष्टै. एका मित्राच्या मित्राचा हात फॅक्चर झाला होता. गेलो होतो भेटायला. पठ्ठ्या बेडवर पडून होता. त्याची बायको सेवेत होती. फॅक्चर हाताला होतं; पण बेडवरनं उठायचंही नाही, फक्त आराम करायचा अशी त्यांची ताकीद होती.
मित्राने विचारलं, काय रे कसं झालं हे?
तेवढ्यात त्या वैनी म्हणाल्या, ‘झालं असं की, त्यादिवशी सकाळी आवरून आम्ही ऑफिसला निघालो होतो. चौकातल्या वळणावर बांधकामाची वाळू पडलेली. आमची गाडी स्लीप झाली. तरी बरं हातावर निभावलं.
मग बघितलं कोणी? घरी कसे आलात?
त्या म्हणाल्या, ‘शेजारी गॅलरीतून बघत होता. आला धावत मग तडक डॉक्टरकडेच नेलं. बघितलं तर आमच्या हाताला फॅक्चर. संध्याकाळी घरी आल्यावरच आम्हाला कळालं.
.....
वैनी आत गेल्यावर मित्र त्याच्या मित्राला म्हणाला, कायरे वैनींना कशाला ऑेफिसला घेवून गेला होतास, विनाकारण त्यांनाही फॅक्चर झालं ना. आणि कारे, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं नाही काय आधी? घरी आल्यावरच कसं कळालं फॅक्चरचं?
तो मित्र कसंनुसं हसला. कण्हत म्हणाला, नाही रे. तिला कशाला नेईल ऑफिसला. मी एकटाच होतो. उलट तिला संध्याकाळी कळालं माझ्या फॅक्चरचं.
अरे त्या तर आता आम्हाला वगैरे म्हणाल्या ना.
मित्राने यावर काही उत्तर दिलं नाही तसं मित्र भनकला आणि म्हणाला, ‘साल्या, तुझा हात फॅक्चर झालाय, तोंड तर चालूये ना. नेमकं कोण कोण होतं गाडीवर नीट सांग ना. त्या म्हणतात आम्ही, तू म्हणतोस एकटाच होतो.
तो काही बोलण्याची शक्यता होती की तेवढ्यात त्याची बायको चहा घेवून आलीही आणि बोलणं खुंटलं.
....
निघता निघता सहज म्हणून मित्र म्हणाला, जरा जपून चालव गाडी. जड वगैरे उचलत जावू नकोस. हाताला सांभाळून राहा. वैनी काळजी घ्या.
त्या म्हणाल्या, हो ना. तेच म्हणतेय. डॉक्टरांनी आम्हाला आराम करायला सांगितलाय. काही दिवस बिलकुलच हात हलवू नका म्हणाले. आम्ही मग सोफ्यावर झोपतो आणि बाजूला टीपॉयवर हात ठेवतो.
मित्राने त्या मित्राकडे बघितलं, नंतर त्याच्या मिसेसकडे बघितलं. मला वाटलं आता तो ‘दोघे कसे मावता सोफ्यावर’ असं विचारतो का कायकी. पण नाही. ‘आम्ही’चा अर्थ एव्हाना त्याला कळाला असावा.
......
राजेरजवाड्यांत ‘आम्ही’चं संबोधन वाचलंय; पण प्रत्यक्षात हे पहिल्यांदाच. त्यातही नव-याच्या हाताला आपलाच हात समजायचा आणि तसं व्यक्त व्हायचं हे ग्रेट!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा