धुळवडीचे धिंडवडे

‘होली खेले रघुवीरा...’ अमिताभचं सकाळपासून आळवणं चालू असतं. आजूबाजूच्या फ्लॅटमधून मूड यायला सुरूवात झालेली असते. हा मूड दुपारपर्यंत व्हाया झिंगझिंग झिंगाट वेंगाबॉइजच्या ‘ब्राझील..’ पर्यंत जातो.

दरम्यान, आपली आत घालमेल चालू असते. आपल्याला धुळवड खेळायची नसते. आपण दारंखिडक्या बंद करून, कुलपं घालून दबून बसलेलो असतो.

कितीही लपून बसा, काही उपयोग नाही. मागच्या दाराने येवून, आरडाओरडा करून, बोंबा मारून आपल्याला कुणी तरी बाहेर काढणारच हा दरवर्षीचा अनुभव लक्षात घेवून आपण खराब कपडे अंगावर चढवलेले असतात. अंगभर तेल फासलेलं असतं. न जाणो आलंच कुणी तर...

बाहेरनं येणा-या आवाजावर आपलं बारीक लक्ष असतं. अधून मधून आपण खिडकी किलकिली करून बाहेरचा अंदाज घेत असतो आणि उगाच चाहूल लागून लगोलग झटक्यात ती बंद करत असतो. कधी तरी उगाच बेल वाजल्याचा भास होतो, आपली आतल्या आत धावपळ होते. कधी आपल्या नावानं कुणीतरी बैलाला म्हणून बोंब मारतंय असं वाटतं.

आपल्याला यंदा खेळायचं नाहीयेय आणि कोरोनाइफेक्टमुळे रंगवायला कुणी येणारही नाही असाही आपला ठाम समज असतो. बराच वेळ उलटून गेलेला असतो. बाहेरचे आवाज कमीजास्त होवू लागलेले असतात. ते विरळ झाल्याचे जाणवायलाही लागते. नंतर आपल्याला वाटायला लागतं की, अरे, काय चाल्लंय काय आपलं? आपल्याला खेळायचं नाहीयेय, मग आपण त्यांची वाट का पाहतोय. सारा दिवस त्यांच्याच हालचालीवर घालवतोय. न खेळून आपण नेमकं काय करतो आहोत याचंही उत्तर आपल्याकडं नसतं.
.........

...तर अशा रितीने बाहेर शांतता झालेली असते. रंगाचं पर्व संपून गेलेलं असतं. आपण निश्वास टाकतो आणि मग येते टोळधाड. दुस-या तिस-या पिढीतली चाभरी मंडळी. यंदा फक्त कोरडा, फक्त कोरडा म्हणत ते आत शिरतात, नंतर दिसतं, त्यांच्या कपड्यांवर ‘मुझे ओला करोना’ चे स्लोगन असतात. तुमच्यासमोर कुठलाही पर्याय उरलेला नसतो.

तुमच्या ‘नो धुळवड’चे छानपैकी धिंडवडे उडालेले असतात!

टिप्पण्या