लॉकडाऊन आणि मोबाईल - १
....तर अशा रितीने मोबाईलने लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यात प्राण सोडला आहे.
टीव्हीमुक्त घराची हौस आता गोवर उठल्यासारखी अंगावर उमलून येते आहे. तो असता तर गेलाबाजार सिनेमे बघता आले असते. पुस्तकं आहेतच सोबत; पण माणसंही लागतातच. प्रत्यक्षातली शक्य नाहीत म्हणून किमान सोशल मिडियावरची तरी.
घरात सगळ्यांचे मोबाईल व्यवस्थित आहेत. म्हटलं तर ते शेअर करतीलही; पण आपण मागणार कसं? आणि दिला तरी त्यावर रेशनिंग येणार. त्यांनाही हवाच की, हा काळ सगळ्यांनाच निभावून न्यायचाये.
आपण वाचत असताना इतर मोबाईलधारकाच्या तोंडून आश्चर्याचे, उद्वेगाचे उद्गार निघतातच, कधी हास्याचे फवारे. पेपर वाचणा-याच्या खांद्यावरनं मान पुढं सरकावत एस्टीत लोक पेपर वाचतात, तसं त्यांच्या मोबाईलमध्ये डोकावावं असं प्रकर्षानं वाटतंय; पण सोशल नसलं तरी किमान फॅमिली डिस्टंन्सिग तरी पाळावंच लागतंय.
...
कुणाला तरी झोप लागलीय, कुणी दुसरं काम करतंय अशी संधी साधून त्याच्या मोबाईलवर झडप घालून त्वरेने आपलं अकाऊंट उघडून चोट्ट्यासारख्या पोष्टी बघणं, पोष्टी टाकणं वगैरे होतंय, होत राहणारै; पण फारच भामट्यासारखं वाटतंय. आता ही पोस्ट टाकतानाही. असं इतरांच्या मोबाईलवर टपून बसायचं म्हणजे बरं लक्षण नाही. शिवाय कानकोंडं व्हायला होतं ते वेगळंच.
तर असो. दरम्यानच्या काळात पुस्तकं वाचणं हीच चांगली सवये हे आपणच आपल्याला पटवून दिलं पाहिजे, पटवायची काय गरजै, तेच खरै, तूर्त अपरिहार्य!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा