चड्डी पहन के फूल खिला है!


.... तर नको असलेल्या आणि अडगळ होवून बसलेल्या जीन्स मग फुरसतीने बाहेर काढल्या. त्यातल्या काहींचा वरचा भाग रोपांसाठी वापरला. काहींच्या पायाचा भाग कुंडीसाठी वापरला. त्यातल्या काही जिन्सचा भाग बागकाम करताना स्वत:ला वापरण्यासाठी राखून ठेवला आणि एक आख्खी जीन्स खतासाठी वापरली. दरवेळी जीन्सचे पायपुसणेच करावे असे नाही.
पानगळीमुळे प्रचंड पालापाचोळा साचला होता. कंपोस्टसाठीचा एक मोठा आणि एक छोटा ड्रम भरला, माठ भरला; तरीही पाचोळा साचतोच आहे. त्याला जागा नव्हती, मग या नको असलेल्या जीन्समध्ये तो भरून ठेवलाय. सिमेंटची चार पोती भरतील एवढा पालापाचोळा या जीन्सच्या दोन पायांत बसतो, ही एक नवी माहिती यामुळे झालेली आहे. जशी जशी त्या पाचोळ्याची माती होईल तसा तसा अजून पाचोळा त्यात सामावेल. बघू, काय होतंय. प्रयोग प्राथमिक पातळीवर आहे. तूर्त हे ‘कंपोस्ट लेग्स’ आंब्याच्या पारावर मस्त बसले आहेत.
दुस-या एका जीन्सपासून कुंडी करण्यामागे एक वेगळा हेतू होता. या जीन्समध्ये भावना गुंतलेल्या होत्या. त्याला एक खंतकिनार होती. ही जीन्स आता जुनी झाली असली, वापरण्यायोग्य राहिली नसली तरी ती आठवण म्हणून जतन करून ठेवायची होती. तिच्या अवशेषाची मग थेट पसरट कुंडी केलीये. ती जतनही झाली आणि त्यात काही रोपेही लावता आली.
वाड्यात मिरच्यांची आणि टमाट्याची भरपूर रोपे अनाहूत उगवून आली होती. त्यांना जीन्सच्या खिशांत लावलंय. बघू, कितीपत येतात. रुजली तर या आठवड्यांत ती फुलं धरतील. मग चड्डी पहन के फुल खिला है असं म्हणता येईल.
(विनम्र सूचना: कंपोस्टसाठी जीन्सचा प्रयोग करताना कुटुंबीयांना आणि घरी येणा-यांना याची पूर्वकल्पना द्यावी, त्यांना एकदा त्या ठिकाणी नेवून आणावे. नसता या पायांकडे अचानक नजर जावून भीती भरण्याचा संभव असतो. भुरट्या चोरांवर मात्र जरब राहू शकतो.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा