अस्वस्थ करणारं

जुनी गोष्टै. बघण्यात एक टुमदार घर होतं. अगदी सुटसुटीत. गजगज इमारतीत ते उठून दिसायचं. खूप बांधकाम नाही, समोर छान जागा सोडलेली, त्यावर लॉन. दर्शनी भागात एक चाफ्याचं आणि एक प्राजक्ताचं झाड. आतल्या बाजूला गुलाबाच्या कुंड्या हारीने ठेवलेल्या. आत जायला साधं गेट, एक मजला, त्यावर कौलं. जाता येता दिसायचं ते. प्रसन्न, टवटवीत वाटायचं. वर्षानुवर्षात कधी त्यात फरक नाही. समोर पालापाचोळा पडलाय किंवा वाकड्या तिकड्या गाड्या उभ्या आहेत असं नाही, एवढं राखलेलं.
घरातली माणसं फार कुणी कधी दिसली नाहीत. एकदाच एक वयस्कर, सडसडीत उंच आणि गोरेपान, टापटीप वेशातले गृहस्थ बाहेर येताना दिसले होते. बस्स! वाटायचं ते गृहस्थ नक्कीच लष्करातून मोठ्या पदावरनं निवृत्त वगैरे झालेले असावेत.
....
एकदा तिथे मंडप दिसला. अगदी छोटा. घराला शोभेसा कलात्मक पण; साधा. कुणीतरी म्हणालं, मुलीचं लग्नै त्यांच्याकडे. अच्छा तर इथं कुटुंब राहतंय, त्यांना मुलगीये. दिसली नाही कधी. तो जो कोण वयस्कर देखणा माणूस दिसला होता, त्याची नात वगैरे असणार. अशा घरात राहते म्हणजे ती नक्कीच गात असणार, किमान एखादं नाजूक वाद्य तरी वाजवत असणार.
....
मुलगा परदेशात वगैरे. देखणा वगैरे. रग्गड पॅकेज वगैरे. स्वाभाविकच.
.....
कुणीतरी स्थळाबद्दल सांगितलं. अलिकडच्या काळातलं प्रस्थ. माणूस दुनियेचा लबाड. मांडवलीत तरबेज. सर्वपक्षिय चाभरा. दिसण्यात- कपड्यात अतिशय गॉडी. बोलण्यात वागण्यात उद्धट. पैशाचा माजच माज. घराच्या अवाढव्य बांधकामापासून गाड्यांच्या ताफ्यापर्यंत ते टपकत राहणारं. त्याच्या तहहयात लाभार्थीची मजबूरी सोडली तर इतर कुणी त्याच्याविषयी चांगलं बोलणारा शोधूनही सापडणार नाही. त्याचा हा मुलगाये म्हणे. ठोकाच चुकला.
....
विषय संपला. त्या टुमदार घराकडे पुन्हा पाहवेना. पूर्वीही तिथं कुणी फारसं दिसत नव्हतं; तरीही बंगला मात्र हसतमुख वाटायचा. आता मात्र घराकडे बघून कसंतरीच वाटू लागलं. या टुमदार बंगल्यात त्या बदमाशाचा पाय पडणं म्हणजे संगमरवरावर गुटख्याची पिचकारी... मृदू आवाजात छान गाणं चालूये आणि त्यात अचानकच भसाडा आवाज घुसावा तसं... त्या माणसाची या घरावर नजर ना जावो आणि त्या गजगजाटात आणखी एका इमारतीची भर ना पडो असं उगाचंच वाटू लागलं. परदेशातल्या त्या पोराला बापाचा वारा लागलेला नसावा, नसणार एवढंच!
.......
रस्त्याने येणा-याजाणा-या प्रत्येकाला या बंगल्याने प्रसन्न ठेवलंय. त्या सगळ्या वाटकरूंच्या अदृष्य शुभेच्छा, आशीर्वाद या घराच्या पाठिशी असणारच. घरात राहणारांना याचा लाभ मिळू दे!

टिप्पण्या