एक गोष्ट अपूर्ण....
शाळेतून आल्यावर स्वैपाक करून ती दवाखान्याच्या दिशेने निघाली. पाठीवर तीनेक वर्षांचं मूल बांधलेलं. दवाखान्यात पोचली तेव्हा बहिण झोपलेली. अशक्तपणामुळे ग्लानी आलेली. पुढ्यातल्या पाळण्यात छोटं बाळ. तिने पाठीवरच्या मुलाला खाली उतरवलं. बहिणीला जेवणासाठी उठवलं.
पाळण्यातल्या आपल्या छोट्या भावाला कुतूहलाने न्याहाळणारं मूल अचानकच किंचाळलं. ‘मावशी हे बाळ आपलं नाहीयेय. बाळ बदललंय.’ दोघींनी चमकून त्याच्याकडे बघितलं. नंतर हसू लागल्या. त्यांचं हसणं त्याला नाही आवडलं. त्याने दोघींच्या मागे पालुपदच लावलं. शेवटी नर्स आली. दोनच तर दिवसाचं बाळ आहे, अजून खुद्द आईलाच निश्चित ओळखता येत नाही आणि हे चिमुरडं काय बोलतंय म्हणून तीही हसू लागली. कसं पाहिजे मग आपल्याला बाळ वगैरे प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडू लागली. सगळेच हसताहेत, आपल्याला गमतीत घेताहेत म्हटल्यावर त्याने भोकाडच पसरलं. त्याचा आरडाओरडा वाढला तेव्हा मग आणखी दोन नर्स आल्या. त्याच्या समाधानासाठी मग खरेच चौकशी सुरू झाली. ज्या काही खाणाखुणा, दवाखान्याने दिलेले नंबर तपासले तेव्हा बाळ बदलल्याचं सिद्ध झालं. मग साहजिकच पळापळ झाली; पण फारसा गहजब न करता प्रकरण मिटलं.
........
बदलता बदलता वाचलेल्या बाळाला ही हकीकत परवा कळाली. ते बाळ आता बाहत्तर वर्षांचं आहे. एका मोठ्या संशोधन केंद्रातून चांगल्या हुद्यावरनं ते सेवानिवृत्त झालं आहे. त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. स्वत:विषयीची अशी अद्भूत घटना या वयात कळाल्यावर काय आणि कसं वाटत असेल माणसाला? नेमकी प्रतिक्रीया कशी असेल त्याची?
समजा, तो बदल लक्षात आला नसता तर आज आपण कुठे असतो? काय असतं आज आपलं जगणं? ज्यांच्याकडे आपण गेलो होतो ते नेमके कोण होते? चुकून बदल झाला होता की कुणी मुद्दाम बदल केला होता? तसं असेल तर त्यांचा हेतू काय असावा? तेव्हाचं ते बाळ आज आपल्याएवढंच असणार; पण ते नेमकं कुठं असेल, कसं असेल? त्यालाही या बदलाबदलीची खबर नसेल काय? असे कितीतरी अनुत्तरित प्रश्न त्याच्या मनात घोंघावत असतील काय? दचकवत असतील काय? इतक्या वर्षात कधीच का कुणकुण लागली नसेल या गोष्टीची आपल्याला? का दडवून ठेवण्यात आली असावी ही कहाणी? माणसाला प्रचंड भंडावून सोडणा-या या गोष्टी.
........
ज्या छोट्याने ही बदलाबदली उघडकीस आणली तो मात्र फार दिवस जगला नाही. तेवढ्यासाठीच जन्माला आल्यागत काम करून निघून गेला. तल्लख बुद्धीसोबतच हट्टीपणाची देणही त्याला होती. आपल्या वागण्याबोलण्यातून तो इतरांना चकित करायचा तसाच आक्रस्ताळेपणाने वैतागूनही सोडायचा. कुठल्यातरी कारणाने त्याचं वडलांशी खटकलं. त्याने बोलणंच सोडलं. लहान मूल आहे. आज ना उद्या विसरून जाईल हा सगळ्यांचा समज त्याने खोटा ठरवला. त्याच दोन दिवसात त्याने अंथरूण धरलं आणि तापाचं निमित्त होवून गेलाही. मरेपर्यंत त्याने अबोला सोडला नाहीच.
........
त्याच्या जाण्याची गोष्ट मावशीवर बेतली. त्याला पाठीवर घेवून फिरणारी दहाबारा वर्षाची ती चिमुकली मावशी या घटनेने प्रचंड हाबकून गेली. तिच्या पाठीवरचं ओझं हलकं झालं; पण पाठ जड झाली. तिला भास होवू लागले. अचानकच कधीतरी तो झाडाच्या फांदीवर दिसायचा आणि जेवलीस का वगैरे चौकशी करायचा. कधी पाठीवर धपकन बसल्याचा भास व्हायचा. तिचं लक्षच उडालं. वेड लागल्यागत ती भयाण फिरू लागली. त्याच्याशी बोलू लागली. बाकीच्यांनी ओळखलं, आता या मुलीला इथे अधिक काळ ठेवू नये. तिला दुसरीकडे पाठवलं पाहिजे.
.......
हळूहळू मग त्याचा विषयच बंद करण्यात आला. तो होता याचाच मूळी कुणी उल्लेख करायचा नाही हे आपसूक ठरून गेलं. त्याचे सगळे किस्से बहिणींनी मनात बंद करून टाकले. अलिकडेच जरा मोकळेपणा आला तेव्हा नानूची ही गोष्ट टप्प्या टप्प्यात समोर आली. सत्तर बाहत्तर वर्षे एखादी गोष्ट मनाच्या कुपीत तशीच ठेवणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे.
आपल्या जागेवर ठेवण्यात आलेलं बाळ, ते ओळखणारा तेव्हा छोटा असणारा मोठा भाऊ या दोघांबद्दल किती प्रश्न पडत असतील. जाणारा तो गेला; पण त्याच्या सावधपणाची हकीकत मागे उरतेच ना. म्हणजे तोही आहेच. तो आज असता तर? हाही प्रश्न पुन्हा आहेच. या वयात माणसाला किती व्यापून टाकत असावेत हे प्रश्न.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा