वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट...

घरासमोरच्या आडातून बादलीभर पाणी शेंदलं आणि आता वाड्यात शिरणार तोच, तिथं वानरांची भलीमोठी टोळी बसलेली. पोटाशी लेकरं घेतलेल्या भारदस्त म्हाळणी, लहान मोठे खोडकर पोरं आणि कदाचित टोळीप्रमुख म्हाळ्याही असावा. त्यांच्या हातात मकाची कणसं होती. पाय-यावर, खुंट्यावर, ओट्यावर जिथे जागा मिळेल तिथे बसून त्यांचं ताव मारणं चालू होतं. कुणीतरी धाब्यावरनं त्यांना हुसकावलं असावं, ती टोळी मग वाड्यात उतरली होती. खरं तर त्यांची जागा समोरच्या लिंबावर, तिथून पत्र्यावर उड्या मारत त्यांचं गावभर हुंदडणं सुरू असायचं. मला आंघोळ करायची होती, शाळेला उशीर होत होता; पण आंघोळीच्या दगडावरही टोळीतल्या काही सदस्यांनी ठाण मांडलं होतं. वाड्यात शिरायची हिंमत होत नव्हती.
ही टोळी इतक्यात वाड्यातून हटण्याची शक्यता नव्हती. धाब्यावर लोकांनी काय काय वाळू घातलेलं. ही मंडळी नासधूस करणारी. कणसंही त्यांनी असेच कुठूनसे लांबवून आणलेले. त्यांना ही जागा सेफ होती. धाब्यावरनं कुणालाच ते दिसत नव्हते. आता कणसं संपल्यावर, त्याची लेंडरं आणि लेंडं टाकल्यावरच टोळी जाणार हे स्पष्ट होतं. शिवाय ते इथून बाहेर पडले तर धाब्यावर काठ्या घेवून एकदोघे तरी उभे असणार याची त्यांना चाहूल असावी.
जाळीचा दरवाज्यातून हात घालून मी वाड्यात टांगलेल्या बांबूवरचा टॉवेल ओढला. त्यांचं कुणाचं लक्ष नव्हतं. पलिकडच्या कट्यावर एक महाशय बसले होते. त्यांचं खाणं चाललं होतं. टॉवेल काढताना बांबू हलला आणि त्याचं एक टोक त्याच्या शेजारून पुढे गेलं आणि भिंतीला लागून परत आलं. त्यानं माझ्याकडे बघून दात विचकले. त्याला वाटलं असावं, मी त्याला मारण्यासाठीच बांबू ढकललाये. नंतर त्यानंही त्याच्याकडचं टोक धरलं आणि माझ्या बाजूला ढकललं. बांबू झुलत राहिला. दगडावर बसलेल्या म्हाळणीनं दरवाजासमोर येत मला घाबरवलं. मी जाळीतून हात आत घेतला.
......
गावातल्या शाळेचं चालत राहतं, बुडवायला खूप कारणं असतातच. मग खिडकीत बसून मी त्यांच्याकडं बघण्यात वेळ घालवायचं ठरवलं. होईल तेव्हा होईल आंघोळ. खिडकीशेजारीच देवघर होतं. देवघराच्या कट्ट्यावर आसंन ठेवलेलं होतं. पूर्वजांपैकी कुणीतरी ते आणलं असावं, ते वाघाचं कातडं होतं.
मी ते घेतलं आणि अंगाभोवती गुंडाळून जाळीच्या दरवाज्यासमोर उभा राहिलो.
मी सहावी सातवीत असेन. खाली पाय तसेच उघडे; पण बाकी कातडं अंगभर पुरलं. कातड्याला दोन भोकं होते. त्यातून बघत मी तोंड झाकून घेतलं. पहिल्यांदा त्यांच्यातल्या कुणीच गिणलं नाही. त्यांचा जोर खाण्यावर होता. काही वेळ गेला आणि एकाचं लक्ष गेलं, मग बाकीच्यांचं. त्यांच्या चेह-यावर आश्चर्य. हे वेगळंच काहीतरी दिसतंय; पण पाय तर माणसाचेचैत. हे आहे काय? हा कोणता प्राणी? ते संभ्रमात. त्यांच्या चेह-यावर भय होतं की नाही आता आठवत नाही; पण त्यांचे विस्फारलेले डोळे आजही जसेच्या तसे आठवतात. माझा तो अवतार बघून त्यातल्या दोन म्हाळणी दरवाज्यापुढे आल्या आणि उभ्या राहून बघू लागल्या, मग अचानकच दचकून मागे गेल्या. हळूहळू टोळीच हलली. पुढे यायचे, मागे जायचे.... बराच वेळ चाललं हे. नंतर मलाच कंटाळा आला, कदाचित त्यांनाही आला असावा. म्हाळणींनी मला घाबरवलं होतं, मीही त्यांना काही वेळ घाबरवून सोडण्याचा प्रयत्न केला.... बस्स! वाघाचं कातडं पांघरून वानरांना फार काळ घाबरवता येत नसतं.
...........
हे सगळं पुन्हा आठवण्याचं कारण, मध्यंतरी गावाकडं एक वानर चक्क घरात शिरून किचन ओट्यावर बसलं होतं. खोली जरा अंधारी असल्याने आईला पहिल्यांदा ते दिसलं नाही. ती किचनमध्ये गेली, तसं ते खाली उतरून निघून गेलं. हा किचनओटा नंतरच्या काळात बांधलाय. हे महाशय जिथं बसले होते, त्याच जागेवर उभं राहून एकेकाळी मी त्यांच्या पूर्वजांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. आताची त्यांची कितवी पिढी असेल देवजाणे. त्यांचं येणंजाणं पूर्वीसारखंच अबाधित आहे; पण एखादा धटिंगण आता घरात घुसायलाही धजावतो आहे!
आई घाबरत नाही. एक तर खोली अंधारी त्यात वयोमानाने तिला स्पष्ट दिसत नाही आणि त्यांचा सहवास तर रोजचाच. उलटपक्षी उन्हाळ्यात इकडे येताना ती त्यांच्यासाठी वाड्यात बादल्यात पाणी भरून ठेवत असते.
मध्यंतरी असंच इकडे निघतांना घरात शेंगदाणे पडलेले दिसले. विचारलं तर ती म्हणाली, राहू दे, उंदरांसाठी. गणपतीच्या कुठल्यातरी मालिकेत तिने उंदरांचं देवपण पाहिलंय तेव्हापासून उंदराबद्दल तिच्या मनात भलतेच भक्तीभाव आले आहेत. अलिकडे तर किचन ओट्यावरही दिसले ते, शेगडीच्या खालून मान बाहेर काढून बारकाल्या डोळ्यांनी पाहताना. ताज्या पोळ्यांचे तुकडेही गेले मग या गणेशाच्या वाहनाला. महिना दोन महिने मग गाव सोडून राहावं लागलं, तोवर तर या उंदरांनी शेंगदाणेच काय फ्रीजचाच फडशा पाडला होता. असो.

टिप्पण्या