गांव, लगबग, प्रश्न

उन्हं कलू लागलीत. चौकातल्या बांधकामाचा धुराळा खाली बसतोय, मलब्याची शेवटची ट्रीप निघालीये. बाया अंगण झाडताहेत, अंगण रस्ताये. आख्खा रस्ताच झाडून निघतोय, पाणी शिंपडलं जातंय. आजूबाजूच्या दुकानात अगरबत्त्या लागल्यात. त्याचा संमिश्र वास रस्ताभर पसरलाये.

वेशीजवळच्या मंदिरात दत्तजन्माची तयारी चालूये. भजनीमंडळींनी जोर पकडलाये. सोन्याबापूचा आवाज मस्त लागलाये. एक काळ होता, त्यांना त्र्यंबकभाऊची तबल्याची साथ होती. ते गेले. जुने गेले की नवे येतात, ते आले. भजनी मंडळ मोठं झालंय. त्यांच्या टाळ मृदंगाने परिसर भारावून गेलाये.
मंदिराचं काम पाहणा-या कैलासची लगबग चालूये. त्याच्या पायात एक कुत्रं घुटमळतंय. तो जिकडे जाईल तिकडे जातंय. मंदिरात शिरतंय, पाय-यावर हातपाय पसरून झोपतंय. त्याला बाकीच्यांशी काही देणंघेणं नाही. त्याचं अवघं विश्व कैलास आहे. त्याचा दत्त कैलास आहे. कैलासच त्याला शेजारच्या दुकानात नेतो, बिस्कीटाचा पुडा उकलून देतो आणि तोच त्याला मंदिराबाहेर घालवतोय. लोकांची येजा चालू आहे. भजनाचा आवाज गावभर पांघरला जातोय.
हे चित्रबद्ध करायला आजूबाजूला मोठमोठाले मोबाईल आहेत. गाव मोबाईलने समृद्ध आहे. बहुतांशी तरण्या हाताचा पंजा त्याने व्यापून आहे. क्लिक केलं निघालं. आपण आता मोबाईल म्यान करतो. आता शब्दातून गाव बघण्याचा प्रयत्न करतो. जुळवाजुळव करतोय शब्दांची; पण गाव हे गाव असतं, दरवेळी नव्यानं उमगत जातं. शब्दात ते मावतं हा भ्रम असतो.
.....

सकाळ असते. पहाटेची पाण्याची लगबग संपून गेलेलीये. तोंडातून जाणारी वाफ आणि नळातून येणारं पाणी दोन्हीही शांतवलंय. गल्लीत रात्रभर एकट्याचंच राज्य असणारा रातराणीचा दरवळ त्यापूर्वीच थांबून गेलाय. गावाच्या मागनं भडक गोळा वर येतोय, अजून त्याने मंदिराचा कळस गाठलेला नाहीयेय; पण थंडीचा कडाका जरा मंदावलाय. दूरवरच्या पारव्याचा गुटरगूं आवाज यावा इतकी शांतता गल्लीभर पसरलेली. समोरच्या चांदणीच्या झाडावर चिमण्यांचे खेळ चालूयेत. वर आभाळात पक्ष्यांचा एक थवा अर्धगोलाकार जातो आहे. समोर दोन पक्षी स्वतंत्र विहार करताहेत. त्यांची कवायत चालू आहे. गावावरनं फेरी मारत त्यांचा थवा जातो आहे. मध्यंतरीच्या पावसानं शेजारच्या धाब्यावर दोन फुट गवत उगवलंये. होत आलेल्या गव्हाच्या पटट्यासारखं दिसतंय ते.
पंचक्रोशीत पावसाने केलेल्या नुकसानीचे पुरावे जागोजागी दिसताहेत. काही शेतात अजून पाणी शिल्लक आहेच. यंदाच्या पावसाने उभ्या पिकाचं नुकसान केलं तसं विहिरीही तुडूंब भरल्या, शेततळे भरले. धरण भरलं, नद्यानाले अद्यापही वाहते आहेत. पाण्याचा प्रश्न मिटलाये; पण झालेल्या नुकसानीचं काय हा प्रश्न शिल्लक आहेच.
फाट्यावर माणसांची ब-यापैकी गर्दी आहे. छोट्यामोठ्या हॉटेलात चहाचे आधणं आहेत. नाष्ट्याच्या कढया दूरवरनं माणसं आपल्याकडे ओढून आणण्याचं कसब कमावून आहेत. माणसांचे घोळके आहेत. घोळक्यात चर्चा आहे, नवे सरकार, पीकविमा, पावसानं केलेलं नुकसान, भेडसावणारा मजुरांचा प्रश्न. कडक मिठ्ठासोबत निरनिराळ्या बाजू मांडल्या जाताहेत. अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रश्न सुटतील ते गाव कसलं?

टिप्पण्या