गुणगुणण्यातले धागेदोरे!

मध्यंतरी मित्राबरोबर बाहेर गावी गेलो होतो. त्याचं काही तरी काम होतं, एका ऑफिसात.

तर त्या साहेबांसमोर आम्ही बसलो होतो. ते मध्येच फोनवर बोलत होते, नंतर गुणगुणत होते. मग पुन्हा आमच्याशी बोलत होते. गृहस्थ चांगले होते.

मधल्या एकदीड मिनीटाच्या रिकाम्या फटीत शिरून मी म्हटलं, ‘साहेब तुम्ही औरंगाबादचे का?’ त्यांनी मान वर करून बघितलं; पण उत्तर दिलं नाही. मग म्हटलं, ‘तुम्ही अशातच शिफ्ट झालात काय इकडे?’ त्यांनी दचकून बघितलं. मग हसले.

मित्राचं काम झालं, नाही झालं ही गोष्ट निराळी; पण त्यांचा अॅप्रोच मात्र आमच्याबद्दल भलताच कौटुंबिक झाला. मित्राने बाहेर आल्यानंतर विचारलं, ‘तू असं का विचारलं त्यांना?आपल्या गावचा माणूस असला तरी तो काम करेल असं काही नाही.’

म्हटलं, ‘त्यांनी काम करावं म्हणून ओळख नाही काढली मी. ते औरंगाबादचे आहेत की नाहीत हेही मला माहीत नाहीयेय. त्यांच्या गुणगुणण्याची आणि माझी ओळख पटत होती कुठेतरी. लक्षात येत नव्हतं; पण ऐकल्याचं जाणवत होतं. म्हणून...’

तो म्हणाला, ‘पण त्यांच्या गुणगुणण्याचा आपल्या शहराशी संबंध काय आणि ते अलिकडेच तिथून इकडे शिफ्ट होण्याशी त्याचा संबंध काय?’ त्याला काय डोंबलं सांगणार? गाण्याच्या ओळखींंचे नेमके अर्थ सांगता येत असतात काय?’
......

माणूस कितीही मोठा असो, त्याच्या कानावर काय पडेल आणि तो काय गुणगुणेल याच्यावर त्याच्यासह कुणीच बंधन आणू शकत नसतं. होतं फक्त एवढंच की, कधीतरी चारचौघांसमोर आपण अमूक गोष्ट गुणगुणलोय आणि ती समोरच्यांच्या लक्षात आलीये म्हटल्यावर तो खजिल होत असतो, बस्स!

जसं भजन, तसंच एखादं अश्लिल गाणंही चुकून गुणगुणल्या जात असतं. साहेबांच्या गुणगुणण्याचं शब्दात रुपांतर करायचं झालं तर त्याचे बोल होते, ‘घंटा गाडी आली हो, आली हो तुमच्या दारी......’ आणि हे अलिकडेच सुरू झालंय कच-याच्या गाडीवर!
...

इकडली माणसं त्यांच्या नकळत दोन गाणी हमखास गुणगुणतात आणि नंतर अचानकच गप्प होतात. त्यातलं वरचं एक, कच-याच्या गाडीवरलं. अशावेळी त्यांचा मूड काहीतरी आवराआवरीचा असतो आणि दुसरं, जगजितसिंग यांचं ‘हे राम...’ स्वर्गरथावरलं. कुठून तरी अस्पष्टसं जरी ते ऐकू आलं तरी पुरेसे असतं. अशावेळी ते मौनात उभे असतात, गुणगुणनं आतल्या आत चालू असतं.

टिप्पण्या