काली मांजर आणि अपराधगंड

सकाळी दार उघडल्या उघडल्या या बाईसाहेब अशी नजर रोखून बघत असतात. आधीच तो कलात्मक रंग, त्यात ते हिरवे डोळे. व्हरांड्यातली ही बैठक त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची झालीये. पूर्वी दार उघडताच त्या लगेच उठून जायच्या. बिबट्या येवून गेल्यापासून त्याच्या या मावशीबाईची चांगलीच भीड चेपली आहे, त्या कूळ लावून आहे. पाळलेलं नसलं तरी धाकधडपशाने त्या राहतातच.

पक्षीमार संघटनेच्या अध्यक्षा शोभाव्यात असं कसबै बाईसाहेबांत. समोरच्या झाडावर अगदी टोकावर चढून नंतर जिभल्या चाटत येताना मी त्यांना खूपदा पाहिलंय. कुणातरी पक्ष्याची अंडी त्यांनी फस्त केली असावीत असं एकूण त्यांच्या देहबोलीवरनं लक्षात येतं. बांबूच्या दाटीत त्या ब-याचदा दबा धरून बसतात. कधीकाळी एखादा पक्षी त्यांना तिथे गवसला असावा. त्याची चटक लागली असावी. सातभाईंना त्यांची लगेच चाहूल लागते आणि त्यांचं चिरकणं सुरू होतं. पण त्या हार मानत नाहीत. त्यांच्या एकूण स्वभावामुळे त्यांनी बब्रूच्या एका लेखात राजकीय हजेरीही लावली आहे.
.....

एकदा फुरसतीत बसलो होतो तर मागच्या बाजूला पक्ष्यांचा कलकलाट भलताच वाढला आणि नंतर तिकडून या बाईसाहेब जिभल्या चाटत येताना दिसल्या. पुरणावरणाचं जेवण केल्यागत डुलत होती स्वारी. नंतर आळ्यात हातपाय पसरून आडव्या झाल्या. तिथून पेंगुळल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू लागल्या. मला जरा चर्रर्र झालं. बाईसाहेबांनी एखादा पक्षी मारलेला असणार. मग संतापच आला आणि हाकलून लावलं त्यांना.

एकदा चौकातल्या गाड्यावर अंडाआम्लेट खाताना मला अचानकच या बाईसाहेब आठवल्या. नंतर फार पूर्वी एकदा दुर्गम भागातल्या हॉटेलात तित्तरची ऑर्डर दिल्याची गोष्ट आठवली. म्हणजे ती जे कष्टपूर्वक करतेय ते तर आपणही करतोय मग तिने पक्षी मारल्याचा, त्यांची अंडी फस्त केल्याचा एवढा गहजब का? असं उगाच आम्लेट खाताना वाटू लागलं.

आपलं अवघडै, भलतेच दुटप्पी असतो आपण!
.......

व्हरांड्यातल्या बैठकीवर रोज सकाळी पहिलं दर्शन त्यांचंच होतं. दरवेळी त्यांच्या भोचक डोळ्यात मला छद्मी भाव दिसू लागतात.

टिप्पण्या