कवठाची चटणी

आंबट, तुरट आणि गोड अशा त्रिवेणी चवीचा बादशहाये कवठ. गूळ टाकून त्याला कितीही एकरूप करा, संगीताच्या तुकड्यातून एकेक वाद्य वेगळं काढून ऐकल्यागत त्यातला प्रत्येक जण आपल्या चवीचा स्वतंत्र ठसा उमटवत असतो.
कमीजास्त काही झालंय का म्हणून आपल्याला चवीपुरतं चमचाभर दिलं जातं आणि त्याच चवीवर स्वार होवून आपण चटणीभोवती घुटमळत राहतो.
पहिल्याच घासात त्यातल्या बिया रांग लावून एकेक अशा आपल्या दाताखाली येत असतात. आपणही मग हलक्या दाताने त्यावर किंचित दाब देतो. आहाहा... त्या बियेचं स्वत:ला हळूवार फोडून घेणं, ते फुटताना एका दाताची दुसऱ्या दाताला खबर लागू नये याची घेतलेली दक्षता, मग त्यातला मगज बाहेर पडून त्याचं त्या परिसरात पसरणं, त्याचा जिव्हाळ्याचा स्पर्श, या सोहळ्यातली जिऱ्याची उपस्थिती.... सगळं वर्णनापलिकडचं. स्वर्गीय.
दरम्यान, खिसताना राहून गेलेला गुळाचा चुकार खडा त्या बियांशी खेळण्याच्या नादात घुमून फिरून अचानक आपल्या दाताखाली यावा, तिथून त्यानं जिभेवर आपला रस पसरवावा... मग तर कडेलोटच!
.....
'कवठाची चटणी' असं भलतंच रूक्ष आणि भद्द नाव का दिलं असावं या पदार्थाला? दुसरं काही म्हणतात का याला?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा