कुस्क-याची पानं.....

कुस्करा ही भलती मध्यमवर्गीय भयंकर गोष्ट असते. तिने तुमचं आयुष्य झपाटून टाकलेलं असतं. दुनिया कुठेही, कितीही पुढे जावो, जगभरचे पदार्थ तुमच्या दारी येवो; पण कुस्करा मात्र आपल्याला आपल्या मूळ चवस्वभावाशी जोडून ठेवत असतो. तो च्वभाव आपल्यातला खवय्या जिवंत ठेवत असतो.
बस्स, दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्याचे पालन अनिवार्य असते. ते म्हणजे कुस्क-यासाठी ताज्या पोळ्या वापरण्याचा अगोचरपणा आणि तो मिक्सरमध्ये बारीक करण्याचे पाप कधी करू नये.
तर आदल्या दिवशी पोळ्या / चपात्या शिळायला ठेवाव्यात. दुस-या दिवशी त्या आपोआप शिळून येतात. मग सकाळी हलक्या हाताने त्याचे निरनिराळ्या आकाराचे तुकडे करावेत. हे तयार करत असताना अंगात उत्साह संचारावा म्हणून त्या तुकड्यांना कुस्क-याची पानं असं संबोधलं जावं. फोडणीनंतर या पानापानाला सोनेरे तांबूस रंग यावा. तो भरजरी दागिन्यासारखा उठून दिसावा. त्यावर मोहरीच्या ठिपक्यांचं गोंदण असावं. कांदा, शेंगदाणा, कडीपत्त्याने त्यांना दिलेल्या मर्यादेत राहावे याची दक्षता घ्यावी. उगाच त्यांना आपल्या जागा वाढवू देवू नयेत. या दिवसात दोनपाच मटारमोतीही टाकायला हरकत नाही; पण दिसण्यापुरतेच. नंतर मग रसदार लिंबाच्या फोडीला नाजूक हाताने दाब देवून डिशवरनं सैरभैर फिरवून आणावे. कोथिंबीर अशी भिरभिरावी की, पोटाआधी डोळ्यांची भूक शमावी.
खाण्यासाठी चमचा वापरावा की हाताने खावे हा प्रश्न ऐच्छिक असला तरी हाताच्या स्पर्शाने त्याच्या चवीत आत्मियता येते वगैरे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो. मात्र एक नक्की करावे, त्याचा एकेक घास असा हळूवार घ्यावा की, त्या घासातल्या जिन्नसांना आपापसात कुजबूज करण्याची तीव्र इच्छा व्हावी. त्याने चोचले पूर्ण होतात.
कुस्क-यात शेव, चिवडा, दही वगैरेंना शक्यतो मज्जाव करावा. तसे केल्यास चवीची देवता भयानक शाप देते. मग खाणा-याला खाताखाता झोप लागते.
........
कुस्करा आईने केलेला असो, बहिणीने केलेला असो किंवा बायकोने केलेला असो, त्याच्या चवीची जाहीर चिकित्सा कधीच करू नये, ज्याला तुलनेचा मोह आवरता येतो, तो सुखी होतो अन्यथा त्याचाच कुस्करा होण्याचा संभव असतो!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा