मोठ्या बहिणीच्या मैत्रिणी!

मोठ्या बहिणीच्या मैत्रिणी ही एक सुंदर गोष्ट असते. त्यातही आपल्यात आणि तिच्या वयात एक विशिष्ट अंतर असेल तर त्याची गंमत निराळीच असते. ती सगळ्यात मोठी आणि आपण सगळ्यात लहान असतो. म्हणजे बहिणीचा कॉलेजचा सुरुवातीचा काळ आणि आपण थेट प्राथमिक शाळेत.
तिच्या मैत्रिणींचा घोळका घरी येत असतो. आपल्याला त्यांच्यासोबत जावं वाटत असतं. कधी त्या नेतात, कधी दटावत असतात. फिरकी घेत असतात. आपण त्यांच्या मागे मागे लागत असतो.
ते दिवस भुर्रकन उडून जातात. काळ पुढे सरकतो. जो तो जिकडे तिकडे पांगतो. घरात आणखीही भावंड असतात, त्यांनाही मित्रमैत्रिणी असतात; पण कायम लक्षात राहतात त्या मोठीच्या मैत्रिणीच. कारण कळायला लागलेल्या काळात त्यांचाच राबता घरात असतो.
.....
कळंबच्या ज्ञानप्रसारक महाविद्यालयात सत्तरच्या दशकात बहिणीच्या मैत्रिणींचा ग्रुप होता. तिथल्याच नटराज फोटो स्टुडिओत काढलेला त्यांचा एक कृष्णधवल फोटो आहे. अधूनमधून अल्बम चाळताना तो समोर येत असतो.
पुढच्या काळात, काही वर्षानंतर टीव्ही आला. टीव्हीवर जाहिराती येवू लागल्या तेव्हा भलतीच लोकप्रिय झालेली ‘हेमा, रेखा, जया आणि सुषमा...’ ही निरमाची जाहिरात लागली की मला तिच्या मैत्रिणी आठवत. जाहिरातीतल्या या मॉडेल मला त्याच वाटत. कारण त्यांचीही नावे या नावांशी समकालीनच होती.
या मैत्रिणी आता संसाराच्या रगाड्यातून ब-यापैकी मोकळ्या झाल्या आहेत. मधला ४० ते ४५ वर्षांचा काळ गेला आहे. अलिकडच्या काळात संपर्कातून संपर्क होत गेले आणि त्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तो योग जुळूनही आला. वय वर्षे १६ ते थेट ६१ असा हा त्यांचा भेटीचा आणि फोटोचा कार्यक्रम!
.....
त्या काळात तिच्या एका मैत्रिणीकडे निरोप द्यायला मी जायचो. तिच्या घराला एक छोटं गेट होतं. आतमध्ये बरीच झाडंवेली होत्या. रस्त्यावरनं, झाडात दडलेली त्यांच्या दुस-या मजल्यावरची एक खिडकी दिसायची. तिला अर्धवर्तुळाकार कमान होती. उभे गज होते. त्या मजल्यावर कधी मला जायला मिळालं नाही; पण ती खिडकी आणि तिच्या आजूबाजूला हेलकावणा-या झाडांच्या फांद्या पेंटिंग होवून माझ्या डोक्यात पक्के बसले आहे.
तिची एक मैत्रिण फारच मिश्कील होती. मी दुसरी किंवा तिसरीत असेन. बहिणीच्या मागे लागून त्यांच्यासोबत मी जात असे. तिची ही मैत्रिण मला बोटाला धरून नेई. तिचे नख वाढलेले होते आणि त्यावर नेलपॉलिश असे. मी एकदा, नख का वाढवलेस म्हणून तिला विचारल्याचं आठवतं. ती काही सांगण्याच्या आतच बहीण तिला म्हणाली, अगं ये, उगाच काहीतरी सांगून त्याच्या डोक्यात नसतं काही घालू नकोस. तो नखं काढणार नाही आणि त्यावरनं शिव्या खाईल. त्या मैत्रिणीसोबत एकदा मी तिच्या गावीही गेलो होतो. तिच्या शेतात बांधावर बोराचं झाड होतं. स्वत:च्या मालकीचं झाड आणि त्याला लटकलेली टपोरी बोरं हे माझ्यासाठी अप्रूप होतं. तर बहिणीची ती मैत्रिण एकदा चेष्टामस्करीत मला म्हणाली, काय रे लग्न करतोस का माझ्याशी. तसा हशा पिकला. मला बहिणीचा आणि तिच्या मैत्रिणींचा तेव्हा खूप राग आला होता.
ती मैत्रिण मात्र या गेटटुगेदरला येवू शकली नाही.
....
तेव्हा वाटलेला तो अपमान आता मात्र ओठावर हसू आणतो. त्या वयात घडलेले प्रसंग, चेष्टा आपल्या आत खूप खोलवर साचून असते. वयाच्या त्या त्या टप्प्यावर त्यातल्या गमती उलगडत जातात. आपल्या स्वभावाची मूळं अशीच कुठंकुठं दडलेली असतात, ती आपलं जगणं अधिक सुसह्य करतात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा