बसमधले जेष्ठ नागरिक
कंडक्टर मिश्किल असावा. म्हणाला, ‘साहेब, फुल तिकीट देवू काय?’
मीही हसलो. म्हटलं, ‘काय मजाक करता कंडक्टरसाहेब.’
तो बिलकुलच हसला नाही. वैतागून म्हणाला, ‘विचारलेलं बरं असतं साहेब. तिकीट फाडल्यावर, खिशातून कार्ड काढतेत आणि फुल्ल कशाला फाडलं म्हणून हुज्जत घालत बसतेत लोकं. डोक्याला नुसता ताप होतो नंतर.
त्याचा टोन माझ्या लक्षात आला. मी पूर्ण तिकीट घेतलं. उरलेले पाच रुपये त्याने विसरल्यागत केले, मीही त्याला आठवण दिली नाही. पण त्या बदल्यात त्याला आशेनं म्हटलं, ‘काय राव कंडक्टरसाहेब, मी काय साठबिठ वर्षाचा वाटलो काय तुमाला, हाप तिकीट घ्यायला? रंगवत नाही म्हणून केस पांढरे आहेत. अजून ज्येष्ठ नागरिक व्हायला दहाएक वर्ष बाकियेत.’
पाच रुपयांना न जुमानता, न जागता तो हसला नाही. उलट म्हणाला, आम्हाला काय कळतं साहेब समोरच्याचं वय? आणि पांढ-या केसांचं काय घेवून बसलाय. काळे केसवालेही भरपूर असतात, हाप तिकीटवाले. ज्येष्ठ नागरिक व्हायला साठ वर्षाचं थोडंच असावं लागतं? एष्टीत कुणीही ज्येष्ठ नागरिक असतं आणि कोणताही थोराड पोरगा हाप तिकीटाएवढा लहाना शकतो. यष्टीतलं वय वेगळं असतं.
आमची चर्चा एष्टीला फसवणा-या लोकांवर घसरू लागली. मला ती नको होती. मी खूपदा त्याची गाडी रुळावर आणली पण पठ्ठ्या बधला नाही. ‘तुम्ही तर अजून यंगैत.’ अशी साधी ओळ त्याच्या तोंडून शेवटपर्यंत आली नाही. भल्याचे दिवस राहिले नाहीत ब्वॉ. यांना फसवणारेच लोकं पाहिजेत!
ठिकाण आलं की याच्याकडून उरलेले पाच रुपये आवर्जून मागून घ्यायला पाहिजेत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा