अंतरीचा बहर हा

श्रावणात आणि वसंतात बहरलेल्या वेली पाहताना मनात एक आदर्श चित्र उमटतं. आपण चित्रकार नसल्याची खंत मग उफाळून येते.
फुलांनी वेल झुकून गेली आहे. कंपाऊंडवॉलवर तिने आपला पर्णसंभार पसरलाये. दोन तरुणी टाचा उंचावून त्यावरची फुलं टिपताहेत. दोन पायावर बसून दोन लहानग्या अंगणभर पसरलेल्या सड्यातून अलगद चांदण्या निवडून घेताहेत. तिथंच पलिकडे कट्ट्यावर खोडाला टेकून बसलेली त्यांची आईकाकूमावशीमामी वगैरे कोणी एक प्रौढा गजरे करण्यात गुंतलीये. तिच्यासमोरच्या परडीतून फुलं ओसंडताहेत आणि दूरवर घरंगळत जाताना दो-याच्या रिळाने तेवढ्या भागात मस्त गुंता पसरवलाये. त्या गुंत्यात काही पानंफुलंही अडकलीयेत.
...आणि खुर्चीवर बसलेली एक आजी काठीवर एक हात ठेवून हे दृष्य कौतुकाने बघतीये. मधूनच, ‘अगं पलिकडच्या... नाही... नाही... त्या डावीकडच्या फांदीवर वरच्या बाजूला दिसतोये बघ घोस...’ असं सांगून त्यांच्या कार्यात हातभार लावण्याच्या प्रयत्नात आहे.
...
त्या त्या मोसमात मग मी माझ्या परीने परिवारातले सदस्य त्यात घुसवून फिल करत असतो. मग वाटतं की, चित्रकार नाही आहोत तेच बरै. एकदा ते चित्र काढलं की, मनातून ते मिटून जाणार आणि मग त्यात बदल करण्याचा आपला अधिकार आपोआपच संपून जाणार. त्यापेक्षा ते चित्र मनातच राहिलेलं बरं. किमान ते जुनं तरी होणार नाही. मग त्या त्या काळात त्या त्या वयातले कॅरेक्टर आपल्याला त्यात फिल करता येतील.
चित्रात आपण स्वत: कुठेच नसतो; पण चित्र वर्षानुवर्षे डोक्यात असते, मोसमाची वाट पहात!

टिप्पण्या