त्या वळणावर...

घुर्रट माणसाचा तोंडवळा घेतलेला एक डॉगी किंवा पपी किंवा आपल्या भाषेत कुत्रा त्याच्या मालकाला घेवून सकाळी नियमीत फिरायला येत असतो. त्याच्या गळ्यातल्या पट्याचं एक टोक त्याने मालकाच्या हातात दिलेलं असतं.
नुकत्याच चालू पाहणा-या छोट्या बाळाला घातले जाणारे ‘पँऽपँ’ बूट त्याच्या मालकाने घातलेले असतात. ते वाजवत वाजवत तो दुडूकदुडूक चालीने कुत्र्याच्या मागेमागे चालत असतो. त्या बाटुकबैंगन कुत्र्याची नजर तुच्छ आणि देहबोली शिष्ट असते. तुलनेत त्याचा मालक मात्र जरा अडखळत आणि ओढल्यागत चालत असतो.
....
वळणावर एका वाळूच्या ढिगा-यावर एक देशी सडपातळ कुत्री सकाळी अंगाचे वेटोळे करून पसरलेली असते. तिची बारकाली पोरं शेजारच्या कच-यात तोंड खुपसून शोधाशोधीत गुंतलेली असतात. हे रोजचं चित्रै.
तर आज ढळत्या पहाटे आणि उमलत्या सकाळी योगायोगाने आम्ही एकत्र आलो. म्हणजे ती देशी कुत्री वाळूच्या ढिगा-यावर निवांत होती. त्याच वळणाच्या दिशेने मी नेमका जात होतो आणि त्याचवेळी फॉॅरेनब्रीडचा तो डॉगी मालकाला घेवून तिथून परत येत होता. कच-यात हुंदडणा-या कुत्रीच्या पिल्लांतलं एक मरतुकडं पिल्लू नेमकं रस्त्याच्या कडेवर आलं होतं आणि तिथल्या एका पाईपावर पाय वर करून स्वत:त मग्न होतं. त्याला नेमकं शेजारून जाणा-या या ऐटबाज डॉगीची चाहूल लागली आणि ते कुतूहलाने त्याच्याकडे बघू लागलं. मात्र त्याने आपली आहे ती पोज बिलकुलच मोडली नाही. वळवता येईल तेवढी मान वळवली आणि परिणामी तोल जावून ते बदक्कन पडलं.
बरं पडल्याचा राग असा की, किरट्या आवाजात भुंकत ते त्या डॉगीच्या मागे धावलं. त्याची चाहुल लागताच मालकाचं पँऽपँ आणखी जोरात वाजलं. डॉगी मात्र टस की मस. त्याने क्षणभर थांबून त्या बारक्याला एक लूक दिला, नंतर मान वळवून चालू लागला. फक्त एवढीच दखल, पुन्हा बघण्याचे कष्टही नाहीत. बारक्यानं आपलं उर्वरित भुंकणं आत ओढलं, त्याचा विचित्र गुर्रर्र आवाज आला. बस्स!
...
च्यायला सकाळी सकाळी कायपण दिसत राहतं!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा