एका डॉक्टरांचं जाणं...

उतारवयात भेटलेला उमदा डॉक्टर, पेशंटला आपल्या पालकागत वाटत असतो. त्याच्या दृष्टीने हे नातं निव्वळ डॉक्टर आणि पेशंट असं उरत नाही.

डॉक्टरांचे शेकडो पेशंट असतात; पेशंटसाठी मात्र तसं नसतं. त्यांच्यासाठी तो डॉक्टर म्हणजे प्रकृतीच्या तक्रारीची हक्काची जागा असते.

वर्गातला वांड पोरगा आपोआप वठणीवर येईल म्हणून मास्तर इतर पोरांना जसं समजावून देतात तसंच मग डॉक्टर पेशंटच्या प्रकृतीबद्दल दिलासादायक चार शब्द सांगतात. त्यांच्यासाठी ते जगण्याची प्रेरणा देणारे असतात.

अशा एखाद्या डॉक्टरांचं अकाली जाणं मग आभाळ कोसळल्यासारखं असतं. डॉ. राजीव मोहगावकरांचं जाणं आमच्या घरासाठी असंच होतं.
....

आधी आईच्या खुब्याचं आणि नंतर वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन त्यांच्याकडेच झालं.
हाड मोडल्याने प्रचंड वेदनेने तळमळणा-या आईने जगायची इच्छा सोडून दिली होती, त्याच्या तिस-याच दिवशी ती ठिकठाक होवून घरी आली; पण तिच्यापुढे प्रश्नच होता, तो म्हणजे, पूर्वीसारखं चालता येईल काय आणि गावाकडे जावून राहता येईल काय? गावाकडची घडी आता विस्कटणार आणि कायमसाठी इकडे येवून राहावं लागणार याची भीती तिच्या मनात होती. तिला गाव सोडायचं नव्हतं.

डॉक्टरांचं म्हणणं होतं, तुम्ही बिलकुलच जावू शकता, फक्त मी सांगितलेला व्यायाम करा. महिनाभराने दाखवा. तिने ते सगळं पाळलं. अगदी रात्री अपरात्री उठून वॉकर घेवून चालण्याचा जिद्दीने सराव केला. काही दिवसात वॉकर गेला आणि काठी आली. काही महिन्यात काठीही गेली. चालायला त्रास होईल म्हणून गावाकडे असणारे भले मोठे उंबरे काढायचे होते, तेही तिने काढू दिले नाहीत.

काही काळानंतर वडिलांच्या दोन्ही गुडघ्यावर त्यांच्याकडेच शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांचाही हाच प्रश्न होता, त्यांच्यासाठी म्हणून आईलाही गाव सोडावं लागणार याची चिंता होतीच. शहरातलं वातावरण त्यांना मानवत नाही; पण त्यांच्याही प्रश्नावर डॉक्टरांचं पूर्वीचंच उत्तर होतं.

या गोष्टीला काही वर्ष उलटून गेली. दोघांनीही केव्हाच ऐंशी ओलांडलीये. ते अजूनही गावाकडेच, स्वतंत्र, स्वच्छ, निरोगी जीवन जगतात. वयोमानाने हाडाचंच ते काय दुखणं. ते दाखवायला अधूनमधून इकडे येत असतात. त्यांना गावाकडं राहण्याचा आत्मविश्वास, बळ देणारे डॉक्टरच होतेच. झालं काही तर आहेत डॉक्टर हा भरोसा होताच. ते डॉक्टर गेले. श्रद्धा बसलेल्या डॉक्टरांचं जाणं पेशंटला पुन्हा एकदा अनाथ होण्यासारखं असतं.
...

अगदी तरुण वयात आईला मरणाच्या दाढेतून परत आणणा-या डॉक्टर डावळेंचं नाव आमच्याकडे कायम घेतलं जातं. आता उतारवयात भेटलेल्या डॉक्टर मोहगावकरांचं जाणं त्यांना खचून टाकणारं आहे.

धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या केबीनच्या बाहेर मोकळी, प्रशस्त जागा होती. समोरच्या खुर्च्यांवर नंबरची वाट बघत पेशंट थांबलेले असायचे. नंबर आला की, प्रसन्न चेह-याची ती देखणी मूर्ती खुर्चीत दिसायची. आस्थेवाईक चौकशी व्हायची. ते आता तिथे दिसणार नाहीत, हे भयानक सुन्न करणारं आहे.

जगरहाटी आहे. शेवटी डॉक्टरही माणूसच असतो. तो गेला म्हणून काही उपचार थांबत नसतात. दुसरे डॉक्टरही असतातच. पण तरीही हाडाचं जरा काही दुखणं निघालं की, ‘...आता काय ते डॉक्टरही राहिले नाहीत...’ हा काही दिवस नकळत घरात निघणारा हताश सूर ठोका चुकवणारा असतो.

टिप्पण्या