गुलमोहराचं जाणं....

कॉलनीतली आमची घरं जुनी. नंतर समोर अपार्टमेंट वाढत गेले. एका अपार्टमेंटला तिन्ही बाजूंनी मस्त झाडं लावली होती. त्यातला गुलमोहर माझ्या कंपाऊंडसमोर होता. त्याच्या खोडाचा घेर खूप मोठा होता. त्याची सावली दाट होती. तो फुलायचा तेव्हा केशरी डोंगरच दिसायचा. रस्त्यावरून येणा-या जाणा-यांसाठी त्यानं अक्षरश: फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या असायच्या.
तिथं दुकानाची रांग होती. तिथंच एक वेल्डिंगचं दुकान निघालं. त्याचं काम गुलमोहराखाली चालू असायचं. त्याची टर्रर्र दिवसभर चालायची. अशातच कधीतरी गुलमोहर खंगत गेला. पहिल्यांदा त्याची वरच्या भागातली एक फांदी वाळत वाळत गेली. नंतर दुसरी. असं वाटायचं, तिथं दुसरी फांदी पुन्हा फुटेल. पण नाही. एके वर्षी तर तो फुललाच नाही. उगीच कुठंमुठं दोनेक फांद्यावर दहापाच फुलं दिसली. नंतरच्या पानगळीनंतर तर त्याला पालवीच फुटली नाही. कुठेच पानांचा लवलेश दिसेना.
ओक्याबोक्या फांद्यांमुळे तो आता अधिकच बेकार दिसू लागला. एकदिवस कसला तरी आवाज आला म्हणून मी बाहेर डोकावलो तर रंगीबेरंगी बांधणीचे कपडे घातलेल्या चारपाच बायका दिसल्या. त्यांच्या हातात लांबलचक बांबू होता आणि बांबूला अणकुचीदार खुरप्यासारखं हत्यार होतं. त्यांनी आधी मोठ्या फांद्यांवर तगून राहिलेल्या वाळक्या काटक्या तोडून घेतल्या. नंतर भल्या मोठ्या फांदीला हात घातला. एकीने फांदीच्या टोकाच्या दिशेने बांबू अडकवलेला तर दुसरीने फांदीच्या उगमापाशी. एकामागे एक दोघी झटके द्यायच्या. सातआठ झटक्यात तर त्या अगडबंब फांदीने मान टाकली आणि अलगद त्यांच्यासमोर येऊन पडली.
अपार्टमेंटमधला माणूस ओरडत आला. बायका म्हणाल्या, फांद्या वाळलेल्याच आहेत. एखादी तुटून कोणाच्या अंगावर पडली तर काय भावात पडेल? तरी तो ठाम होता. त्या बायका मग हातात येईल तेवढं सर्पण घेऊन निघून गेल्या. दोन दिवस गेले आणि तिस-या दिवशी त्या पुन्हा हजर झाल्या. यावेळी तो माणूस बाहेरच आला नाही. बायकांचा उद्योग मन लावून चालू होता. त्या फांदी ठोकून बघायच्या. त्या आवाजाने अंदाज आला की, फांदीच्या गळ्यात त्यांचा बांबू हात टाकायचा. अशीच एकेक फांदी त्यांनी आडवी केली. चारेक दिवसात तर त्यांनी आख्खा गुलमाहेर खाली उतरवला.
त्यांचं कसब वाखाणण्यासारखं होतं; पण विनाकारणच निर्दयी वाटत होतं. त्यांच्या बांधणीच्या कपड्यावर मला मात्र गुलमोहराचे हिरवेलाल रंग दिसायचे. त्यांनी उतरवलेला गुलमोहर ठसा म्हणून त्यांच्या कपड्यावर कायमचा उतरलाय असं काहीतरी जाणवायचं.
गुलमोहराचं नंतर खोडच उरलं. खोड आणि त्याखाली वेल्डिंगचं मशीन नंतर खूप दिवस दिसत राहिलं. नंतर ते दुकानही हललं आणि खोडही कधीतरी गायब झालं. नंतर तर पेव्हरब्लॉकनी त्याच्या खाणाखुणाच पुसून टाकल्या. कधीकाळी इथे गुलमोहर होता हे सांगायलाही जागा ठेवली नाही. त्याचा तो केशरी डोंगर कायम डोळ्यासमोर उभा राहतो आणि दर सिझनला छळत राहतो.
काहीच झाडांच्या नशिबी तरल माणसे येतात, ती झाडं अमर होतात. आमच्या समोरचा गुलमोहर बिनाकवितेचाच गेला.
....
तोडलेल्या झाडापेक्षा, खंगत गेलेली, एकेक करून पानं झडून गेलेली आणि सरतेशेवटी फांद्यांचा लाकूडफाटा झालेली झाडं तुलनेनं अधिक अस्वस्थ करतात का?
(पूर्वजांचं अभिमानानं कौतुक सांगावं आणि दाखवायला त्यांचा फोटोच उपलब्ध नसावा, त्या काळात कॅमेरे नव्हते म्हणून मग हळहळ वाटायला लागते. तसं झालंय गुलमोहराचं. त्याचा फोटोच काढायचा राहून गेलाय, कारण मोबाईल कॅमेरे नव्हते. सदर फोटो त्याच्या कुणा भाऊबंदाचाये!)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा