सिगारेट आणि ...
भरारा वा-यात सिगारेट पेटवणा-यांबद्दल मला फार पूर्वीपासून कौतुकै. पंखा चालू असताना साधी उदबत्ती पेटवता येत नाही आपल्याला आणि ही मंडळी मात्र भररस्त्यात, भणाण वा-यात सिगारेट पेटवतात हे कमालीचं वाटतं मला.
खूप पूर्वी, शिकत असताना एकदा आम्ही काही शाळकरी मित्रांनी चोरून सिगारेट प्यायचा प्रयत्न केला होता. गावाकडून देवस्थान असलेल्या दुस-या एका गावाकडे जाणारी एक पायवाट होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं होती. आंब्याची झाडं होती. तर तिथल्या मोठा बुंधा असलेल्या एका झाडाखाली आम्ही येवून थांबलो होतो.
एकाने घरून काडेपेटी आणली होती आणि दहा दहा पैसे जमा करून आम्ही चाळीस पैशांची एक सिगारेट घेतली होती. गाव छोटं असल्याने बोभाटा होईल म्हणून अमूक सरांना पाहिजे असं सांगून ती आणली होती.
ती प्यायची म्हणून प्रचंड एक्साईटमेंट होती. एकाने मग ती तोंडात धरली, दुस-याने काडी पेटवली. सिगारेटच्या जवळ जायच्या आतच ती विझून जायची. मग हाताचा खोपा करून त्यात काही वेळ काडी धरून ठेवायची, चांगली पेटली की, सिगारेट धरलेलं तोंड खाली वाकवून काडी जवळ न्यायचं अशा ब-याच ट्रीक आम्ही करून पाहिल्या; पण यश नाही. सिगारेट सगळ्यांच्या तोंडून फिरली; पण शेवटपर्यंत पेटली नाही. नंतर रस्त्याने भाविकांची संख्या वाढली आणि आम्हाला वाटू लागलं की, ते संशयाने पाहताहेत. त्याच आंब्याशेजारच्या गचपणात आम्ही सिगारेट आणि काडेपेटी लपवली आणि दर्शनासाठी गेलो.
परत येताना पुन्हा नव्याने आम्ही हा कार्यक्रम करून बघितला. एकदा पेटल्यासारखी वाटली; पण ओढण्याचं बेरिंग तुटलं आणि ती विझली. आख्खी काडेपेटी संपवून आणि ती चार तोंडं फिरून ओली झालेली सिगारेट तिथंच फेकून आम्ही परतलो.
....
प्रचंड गदारोळात आणि ताणतणावातही पुस्तकं वाचणा=यांबद्दलही मला असंच कौतुक वाटतं. लॉकडाऊनच्या काळात मित्रांशी फोनाफोनी होतेच. कंटाळा आला म्हणता म्हणता मग विषय येतोच पुस्तकांवर. ‘शेवटी पुस्तकं तर सोबत आहेतच, त्यात वेळ निघून जाईल म्हणा...’ इथपासून सुरू झालेला संवाद मग शेवटी, ‘नाही होत वाचन काहीही. मनच लागत नाहीयेय. एवढ्या दिवसात एक ओळ वाचून झालेली नाहीयेय.’ इथपर्यंत येवून पोहोचतो. नाही होत तर नाही होत. कशाला अट्टहास वाचलंच पाहिजेचा? ज्यांच्याकडून होतं ते ग्रेटैत, त्यांना सलामै; पण आपणही तसंच असावं अशी सक्ती कुठै?
.......
तेव्हा लायटरचा पर्याय नव्हता, आता आलेत ना पर्याय सगळ्याच गोष्टीत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा