झाडं सांगतात माणसाची गोष्ट....

तुम्ही खूप कुणाकुणाकडून रोपं आणलेली असतात, कुणी खास तुमच्यासाठी म्हणून दिलेली असतात. त्या रोपांसाठी तुम्ही घरातली योग्य जागा किंवा कुंडी निवडता. त्यांची देखभाल करता. ती रुजली की प्रचंड खुश होता.
तुम्ही जेव्हा जेव्हा त्या झाडांची वास्तपुस्त करण्यासाठी, खतपाणी घालण्यासाठी त्याच्याकडे जाता त्या त्या वेळी त्या झाडावेलांपाशी काही क्षण आपोआप थबकता. तुम्हाला ते रोप कुणी दिलंय हे पक्कं आठवत राहतं. बंदच्या काळात तर त्या व्यक्तींचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर तरळू लागतात. वेळ असेल तर तुम्ही त्या आठवणीत काही क्षण गढून जाता.
आलेल्या, आणलेल्या, रुजवलेल्या बहुतांशी रोपांबाबत आपलं असं होतं. एकूण काय तर तुम्ही बागेत फिरुन घरात परत येता तेव्हा भरपूर माणसांना भेटून आलेले असता.
अमूक एखाद्या झाडांचा बहराचा काळ असेल तर आणखी उत्साह असतो तुमच्यात. तुम्हाला त्या व्यक्तीचा हसरा चेहराच समोर दिसायला लागतो. मला हे अलिकडे काही दिवसांपासून जाणवायला लागलंय. माझ्याकडे अशी बरीच झाडं आहेत, नातेवाईक, मित्रांकडून आणलेली, आलेली. त्यामुळे खूपदा या लॉकडाऊनमध्येही मी मैफलीत असल्याचा फिल घेतो. दोन्ही बहिणींनी मला बरीच झाडं दिली आहेत, हँगीग पॉट्स भाचीने दिले आहेत. बकुळाचं आणि लिंबाचं रोप भाचेसुनेने दिलंय. मागच्या वर्षापासून या लिंबाला भरपूर लिंबं लागताहेत. मित्र शाहूने नागालँडहून काही रोपं आणून दिलीयेत. त्यापूर्वी त्याने एकदा किलोभर गांडूळ आणून दिले होते. परभणीला गेलो असताना दर्दी वाचक आणि लेखक वि. शं. गौतम यांनी अबोली आणि जांभळा जास्वंद दिला होता. आणखी एक दर्दी वाचक गुरुनाथ परांजपे यांनी केळीची रोपे दिली होती. ती वाढताहेत. दादा गोरे सरांकडून सीतेच्या वेणीची रोपे आणली होती. कविमित्र दासूने फळभाज्यांच्या भरपूर बिया दिल्यात. राजेंद्र सरोवर या मित्रानेही भाज्यांच्या बिया दिल्या होत्या. मध्यंतरी मावशीने काही बिया आणि कंद दिले. मुक्ताला ते कुणीतरी दिलेले. त्यातले काही माझ्याकडे आलेत. बायकोने तिच्या मैत्रिणीकडून ओव्याची आणि आळूची रोपं आणली होती. रस्त्यातून येतायेता कुणा शहा की शर्माच्या कंपाऊंडवॉलशेजारी छाटणी करून टाकलेल्या लसण्यावेलाची फांदीही तिने उचलून आणली होती. ती चांगलीच रुजली आहे. ही तशी तोकडी यादीयेय, नमुना म्हणून...
आधीची जी झाडं घरात होती, ती आईने कुणाकुणाकडून आणली होती ते आईने सांगितलेलंय. तिच्या शाळेतून, तिच्या भावाकडून, बहिणीच्या कॉलेजातून, तिच्या माहेराहून अशी कुठून कुठून तिने रोपं आणली, लावली, रुजवलीयेत. ती स्थळं, ती माणसं यांची आठवण कायम त्या त्या झाडांपाशी होते.
....तर ही सगळी माणसं लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे आहेत. त्यांचा मेळाच भरलाये. तुम्हीही आठवून पाहा, तुमच्याकडच्या रोपांत तुमचे जीवलग. मजा येते, ऊर्जा येते, उत्साह येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा