लसूण लालमिर्ची वगैरे....

...तर ही पाट्यावरची लसूण-लालमिर्ची चटणी, ताक शिंपडून. नंतर वरनं फोडणीही घातलीये...

पहिल्या घासाला पाणी मागतो माणूस. जीभ आगआग, तोंड भाजून निघाल्यासारखं वाटतं. हाशहुशचे आवर्तनं होत राहतात. खरं तर उत्साहाच्या भरात भाकरीच्या तुकड्याचं आणि चटणीचं प्रमाण आपल्याकडून हुकलेलं असतं. आपण जरा जास्तच चटणी घेतलेली असते. पोळलेलं तोंड मग आपल्याला दुस-या भाज्यावरणांकडे घेवून जातं. यावेळी तुलनेत वांग्याची तर्रीदार भाजीही आपल्याला आळणी लागायला लागते; पण जीभ थंडावल्याने आपण शांत होतो.

असंच कुठं भाजी, कुठं वरण असा घासप्रवास चालू असताना आपल्याला पुन्हा फिरून त्या चटणीकडे जायची तीव्र इच्छा होते. खरं तर दोनदा तिकडे हात फिरून आलेला असतो; पण हिंमत झालेली नसते. ती पोळलेली जीभ आता कुठं सामान्य स्थितीत येवू लागलेली असते. आपण संभ्रमात असतो. घ्यावा काय एक घास? नको! नाही घ्यावाच. मग जातोच आपला हात चटणीकडे. भाकरीच्या पदरावर मग तिचा असा ठसा उमटून येतो की, जणू काही पैठणीवरचा जरतारी मोर! आहा, काय तो रंग!!

खरं तर आपल्याला कळत नसतं, ते पोळणं आपल्याला मनापासून हवं असतं. तो अनुभव पुन्हा घ्यावा वाटत असतो. हो, लागू दे प्रत्येक घासाला पाणी, येवू दे नाकातोंडातून पाणी, पण ती चव मला हवीये.. असं काहीसं आपल्या आत चालू असतं, ते वर यायला धडपडत असतं; पण दुसरीकडे आपणच कर्मठासारखं त्या पोळण्याचं भांडवल करून हटून असतो. आत भयंकर द्वंद्व चालू असतं.

झालेलं असं असतं की, पहिल्याच घासात लागलेला चटणीचा जहरी चटका निघून जातो; पण चव मात्र तोंडभर रेंगाळून राहिलेली असते. हाशहुश कमी व्हावं म्हणून आपण नंतर जे काही खातो त्या सगळ्या चवी पहिल्या चवीच्या थरावरून घरंगळून गेलेल्या असतात, जात असतात. तिथं बाकी कुठलीच चव टिकू शकत नाही. साम्र्राज्य असतं चटणीचं, फक्त चटणीचं.

जाता जाता : १. ज्याला तेवढं तिखट सहन होणार नाही त्याने किंचित मीठ जास्त घालावं, त्यात थोडं दाण्याचं कूट घालावं. ते कूटही पाट्यावर जाडंभरडं वाटलेलं असेल तर उत्तम.
२. जमिनीवर बसूनच पाट्यावर चटणी वाटायला सोपं जातं; पण नंतर मात्र तो पसारा धुण्यासाठी उचलून सिंकमध्ये घ्यायला फार जीवावर येतं. आधीच त्यावर जहरी तिखट, त्यात ते जडबदक! बाकी ओके!!

टिप्पण्या