पत्र्याची खोली

पाऊस कोसळायला लागला की पत्र्याच्या घरात जावून राहावसं वाटतं. पत्र्यावर पावसाचं लयबद्ध नृत्य चालू असतं. खाली आपल्याला त्याच्या चढउताराशिवाय काहीही ऐकू येत नसतं. त्याच्याच तालात ताल मिसळून आपल्याला डुलत राहावं वाटतं.
एका तालुक्याच्या ठिकाणी आम्ही किरायाच्या घरात राहात होतो. तिथे पत्रे होते. दोन खोल्या. एक लांबलचक स्वयंपाकघर आणि समोर एक छोटीशी बैठक.
बैठकीच्या खोलीत एक मोठं लाकडी कपाट होतं. त्यात कपडे ठेवलेले असत. त्याच्या बाजूलाच एका शोकेसमध्ये मर्फीचा रेडिओ ठेवलेला असे. सत्तरचं दशक, मी दुसरीत वगैरे, बहीण माझ्यापेक्षा थोडी मोठी.
कपाटाला चार कप्पे होते. पाऊस सुरू झाला की, मधले दोन कप्पे आम्ही रिकामे करून इतर कप्प्यात ते कपडे कोंबायचो आणि एकेका कप्प्यात जावून झोपायचो. पत्र्यावर टपकणारा पाऊस, कपाटातली उब आणि रेडिओवर बालोद्यान.... आहाहा!
आई गव्हाची खिर वगैरे तत्सम काहीतरी करत असायची. त्याचा वास बैठकीत घुमायचा.
ते कपाट अगदी चारेक वर्षापूर्वीपर्यंत होतं. नंतर गेलं कुजून.
पत्र्यावर पावसाचं नृत्य सुरू झालं की, हे आवर्जून आठवतं, आजही आठवलं. केवढा काळ लोटलाये, बहीण बसलीये आता त्या कपाटात मावले असते असे नातवंडं खेळवत.

टिप्पण्या