रस्त्यातलं घर

एखाद्या प्लास्टर उडालेल्या कंपाऊंडवॉलवर खापराचं टेकण देवून कशीबशी तगून ठेवलेली; पण रोप तरारून आलेली मातीची कुंडी मला भावते. तिच्यात निराळाच जिव्हाळा असतो. अशा कुंडीत बहुतांशी तुळस असते किंवा मग कोरफड.
फिरण्याच्या रस्त्यात भरपूर मोठे बंगले लागतात. अर्थातच तिथं त-हेत-हेची आकार दिलेली झाडं दिसतात. रंगीबेरंगी कुुंड्या हारीनं मांडून ठेवलेल्या असतात. येणा-या जाणा-याचं लक्ष आकर्षून घेणारी मस्त रचना असते. मला आवडतं ते; पण याच रस्त्यावर एक घरै, ओबडधोबड. त्या सगळ्या परिसरात तेवढंच एक घर तसै. हटून बसलेलं. मोठमोठ्या बंगल्यामध्ये चेपून गेलेलं. तरीही आहे त्या जागेत कन्हेराचं अस्ताव्यस्त वाढलेलं; पण लाल फुलांनी गच्च भरलेलं झाडै. बाहेर डोकावणारे एकदोन वेल आहेत, तेही मनसोक्त वाढलेले आहेत. प्रवेशद्वार आणि कंपाऊडवॉलमध्ये जेमतेम अंतरै. तिथेच एक कुंडी अशी ठेवलीये की, रस्त्यावरनं जाणा-याला वाटावं, ही पडणार आता. पण त्यातली तुळस अशी गच्च बहरून आलीये की, तुमची नजर काही क्षण तिथं थबकतेच. बाजूलाच दिव्यासाठी छोटीशी जागा आहे, विटांचा खोपा केलेली.
एका संध्याकाळी मी तिथून जाताना अचानक वीज गायब झालेली होती. रस्त्यावर अंधार. अंधारातून दिसत होता, तुळशीपुढचा तेवढा तेवणारा दिवा. त्या इवल्याशा दिव्याचा प्रकाश सगळ्या परिसराचं लक्ष वेधून घेणारा. एकदम प्रसन्न वाटलं. नंतर एका सकाळी तिकडून जाताना त्या घराची अवकळा लक्षात आली. पण संध्याकाळचं त्याचं भारावून टाकणारं दर्शन इतकं पक्कं डोक्यात बसलं होतं की, कुठल्याही प्रहरी जावो, मला त्या परिसरात तेच एकमेव जिवंत घर वाटू लागलं. कुठलीच कृत्रिमता नसलेलं.
मला खूपदा असं जाणवतं की, फारशी काळजी न घेताही अशा ठिकाणची झाडं भलतीच रसरसून वाढलेली असतात. इतर काही झाडांच्या तुलनेत ते डेरेदार आणि निरोगी भासतात. शेजारपाजारच्या देखण्या झाडांना न्यूनगंड यावा असे ते भारदस्त दिसत असतात. वेलींच्या अस्ताव्यस्त झिप-या त्यांना उठून दिसतात.
तिथल्या झाडांना स्पर्शाची भाषा कळत असावी, असं मला राहून राहून वाटतं.
......
त्या घराच्या बैठकीतल्या भिंतीवर कॅलेंडर फडफडत असणार आणि त्यावर लाल शाईत आठवणीच्या खुणा केलेल्या असणार, त्यांच्या दिवाणवरचा लोड चपटा झालेला असणार असंही एक कल्पनाचित्र उगाचंच माझ्या डोळ्यासमोर येतं. खात्री करावी म्हणून आत जावून ते बघण्याचाही मोह होतो.

टिप्पण्या