न दाखवायचे फोटो
आपल्या अल्बममध्ये काही फोटो असे असतात की, ते आपल्याला कुणाला दाखवावे वाटत नाहीत; पण जुने असल्याने आणि त्या काळची आठवण म्हणून आपल्याला ते फेकवतही नाहीत. मग ‘ओन्ली मी’ च्या नावाखाली ते ड्राव्हरच्या खालच्या कप्प्यात शेअर झालेले असतात.
......
कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात माझा एक सिनियर मित्र होता. त्याचा एक मित्र टेलर होता. त्या टेलरला व्यायामाची प्रचंड आवड होती. तो एका दुकानात दिवसभर टेलरिंग काम करायचा आणि जरा अंधार पडला की, जिल्हापरिषद शाळेच्या मैदानावर दंडबैठका आणि सूर्यनमस्कार घालायचा. आम्हीही त्याच्याकडे जावू लागलो.
हळूहळू सूर्यनमस्कारामध्ये प्रगती होऊ लागली. पाचाचे दहा, दहाचे वीस अशी कमान चढत गेली. नंतर तर अगदी मोजून शंभर मारण्यापर्यंत मजल गेली. कोण जास्त सूर्यनमस्कार घालतं याची पैज लावून आपापसात स्पर्धाही घेतली आम्ही. तर हळूहळू शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागले. गालं बसले; पण दंडात बेंडकुळ्या दिसू लागल्या. छाती चौडी झाली, पोट ब-यापैकी उतरलं. टाईट हापशर्ट घालून फिरण्याची तेव्हा क्रेझ होती, वरची गुंडी उघडी ठेवून.
.......
चौकात एक साऊथ इंडियन फोटोग्राफर होता. मस्त फोटो काढायचा. तर आम्ही, जे व्यायामवाले दोघंतिघं होतो त्यांनी फोटो काढायचं ठरवलं. मग त्याच्याकडच्या बाकड्यावर बसून आम्ही छात्या फुगवल्या, पोट आत ओढलं. शरीरसौष्ठववाले करतात तसा श्वास रोखून धरला. नंतर फोटोग्राफर म्हणाला, इसमे कुछ मजा नही है, त्यापेक्षा शर्ट काढून उघडे बसा. कटस् दिसले पाहिजेत. आम्ही त्याचं ऐकलं. शर्ट काढले आणि पुन्हा नव्याने छात्या फुगवून, पोट आत ओढून, श्वास रोखून उघडेबंब बसलो. त्याने फोटो काढला.
......
परवा जुना फोटो शोधत होतो, तर तो फोटो मिळाला आणि प्रचंड हसू आलंच. कुणालाच दाखवायच्या कामाचा नाही बेट्याचा; पण फेकूनही देता येत नाही. तो मागेच फेकला असता तर आज त्यामागचा खटाटोप विसरून गेला असता. चला, त्याचं तेवढंच महत्त्व!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा